गुरुग्राम- द्वारका महामार्गावरील उड्डाण पुल कोसळला; निर्माणाधिन असलेल्या उड्डाण पुलाचा भाग कोसळून 3 कामगार जखमी

गुरुग्राम : हरियाणातील दौलताबादजवळील गुरुग्राम – द्वारका द्रुतगती महामार्गावरील बांधकाम सुरु असलेला उड्डाण पुल कोसळला. या दुघर्टनेत ३ कामगार जखमी झाले आहेत. ही घटना सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली.

गुरुग्राम -द्वारका द्रुतगती महामार्गावरील हा उड्डाणपुलाचे पायाचे काम पूर्ण झाले होते. त्यावर गल्डर टाकण्याचे काम सुरु होते. एका बाजूचे गल्डर टाकण्याचे काम पूर्ण झाले होते. गल्डर टाकलेला दोन खांबामधील एक मोठा भाग सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळला. सुदैवाने अगदी सकाळची वेळ असल्याने तेथे कोणतेही काम सुरु नव्हते. तेथे असलेले ३ कामगार जखमी झाले असून त्यांना गुडगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असल्याचे पोलीस उपायुक्त दीपक सहारन यांनी सांगितले.

द्वारका एक्सप्रेस वे चे प्रकल्प संचालक निर्माण जांभुळकर यांनी सांगितले की, पुल पडण्याचे कारण अद्याप समजले नाही. याप्रकरणाची चौकशी सुरु केली जाईल. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. त्या ठिकाणी कोणतेही काम सुरु नव्हते.