शेतकरी आंदोलनामुळे खट्टर सरकार अडचणीत, उपमुख्यमंत्री राजीनामा देणार !

नवी दिल्ली : पोलिसनामा ऑनलाईन – केंद्र सरकारने दोन महिन्यांपूर्वी केलेले कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. उत्तर भारतातील शेतकरी एकवटले असून गेल्या आठवडाभरापासून दिल्लीच्या सीमेवर हे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाची झळ हरयाणामधील भाजप सरकारला बसू लागली आहे. हरयाणात मित्र पक्ष असलेल्या जननायक जनता पार्टीने (जेजेपी ) सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदी दुष्यंत चौटाला असे पर्यंत शेतमालाच्या एमएसपीवर कोणतेही गंडांतर येऊ देणार नाही. जर शेतकऱ्यांना एमएसपीवर नुकसान झाले तर चौटाला तात्काळ राजीनामा देतील, असा इशारा दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

शेतकऱ्यांवर आंदोलनाची वेळ आली हि अत्यंत निंदनीय बाब आहे. त्यामुळे केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागणांवर लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी देखील जेजेपीने केली असल्याचे जेजेपीचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रतीक सोम यांनी आयएनएसला माहिती देताना सांगितले.

आम्ही नेहमी शेतकऱ्यांचा विचार करतो. शेतकऱ्यांना हे सांगू इच्छितो की चौटाला चंदीगढमध्ये असेपर्यंत एमएसपीवर गदा येऊ देणार नाही. तरीही जर दगाफटका झालाच तर पहिला राजीनामा हा चौटाला यांचा असेल, असे ते म्हणाले. प्रतीक सोम म्हणाले, चौधरी देवीलाल यांच्या विचारधारेवर चालणारा जेजेपी पक्ष आहे. आम्ही केंद्र सरकारकडे सहानुभूतीने मागण्यांवर विचार करण्याची मागणी केली आहे. एमएसपीवर सरकारला ठोस आश्वासन मिळणे गरजेचे आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करून मुद्दे सोडवेल, अशी आशा आहे.

महाराष्ट्रातही आज शेतकऱ्यांचा एल्गार; रास्ता रोको करणार
नव्या कृषी कायद्यांविरोधातील देशव्यापी आंदोलन आणखी तीव्र होणार असून याचे पडसाद आता महाराष्ट्रातही उमटू लागले आहे. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीसह विविध शेतकरी संघटनांनी आज उग्र आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे.

महाराष्ट्रात सर्व समविचारी शेतकरी संघटना तसेच शेतमजूर, कामगार, विद्यार्थी, युवक, महिला संघटनांचे कार्यकर्ते सर्व जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयावर मोर्चे काढून तथा ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करणार आहेत. शेतकरी नेते राजू शेट्टी, डॉ. अशोक ढवळे, मेधा पाटकर, प्रतिभा शिंदे, नामदेव गावडे, सीमा कुलकर्णी, सुभाष लोमटे, डॉ. अजित नवले आदींच्या नेतृत्वात हे आंदोलन होईल.

You might also like