विश्लेषण : ‘खंजीर’चा इतिहास ‘पवार’ यांच्यावर उलटला का?

पोलीसनामा ऑनलाइन –  शरद पवार महाराष्ट्रातील जुने जाणते नेते, चार वेळा मुख्यमंत्रीपद भुषविलेले नेते आज राष्ट्रवादी काँग्रेसमधून होत असलेल्या गच्छंतीमुळे हवालदिल झाल्याचे व ते चिडचिड करु लागल्याचे दिसून येऊ लागले आहे. ४० वर्षापूर्वी राज्याचा सर्वात तरुण मुख्यमंत्री होताना शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडले होते. तेव्हापासून पाठीत खंजीर खुपसणे हे बिरुद शरद पवार यांच्या मागे लागले ते अद्याप कायम आहे. त्यामुळेच आता राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक नेते भाजपा, शिवसेनेत जात आहे. त्यावेळी हा इतिहास पुन्हा चर्चेला जात असून या घडामोडीवर पेरावे तसे उगविते, अशी चर्चा सुरु झाली आहे.

शरद पवार यांच्यावर जीव ओवाळून टाकणारे जसे आहेत, तसेच त्यांना कायम विरुद्ध करणाऱ्यांची संख्या राज्यात मोठी आहे. एका बाजूला त्यांनी महाराष्ट्रासाठी, देशासाठी केलेल्या कामाची यादी सांगितली जाते. त्याचवेळी त्यांनी शाहू, फुले आंबेडकर यांचे नाव घेत जातीपातीत भांडणे लावून देत केवळ मराठा राजकारण केले, असे टोकाचा विरोध करणारेही राज्यात सर्वत्र आहेत.

१९७८ साली शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडून जनता दलाच्या मदतीने आपले सरकार बनविले होते. त्यावेळी वसंतदादांनी आपल्या पाठीत खंजीर खुपल्याचे वक्तव्य केले होते. त्यावरुन खंजीर खुपण्याचा आरोप शरद पवार यांच्यावर कायमचाच चिकटला.

ते काँग्रेसमध्ये असले तरी कधीही काँग्रेसमध्ये मिसळून राहिले नाहीत. काँग्रेसमध्ये असताना पक्षात त्यांचा स्वतंत्र गट कार्यरत असे. आपल्या गटातील नेत्यांना तिकीट मिळवून देता आले नाही तर त्याला बंडखोरी करायला लावून ते त्याला विजयी करण्यासाठी आतून प्रयत्न करीत असा नेहमीच आरोप होत गेला आहे. पक्षातील आपल्या पक्षांतर्गत विरोधकांना नमविण्यासाठी त्यांनी नेहमीच विरोधी काम केले. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, विठ्ठलराव गाडगीळ या काँग्रेस पक्षांतर्गत विरोधकांचा त्यांनी पराभव घडवून आणला होता.

आपल्या जवळच्या लोकांच्या भ्रष्टाचाराकडे त्यांनी नेहमीच दुर्लक्ष केले. आपल्या जवळच्या नेत्यांना त्यांनी त्यांच्या तालुक्यात, जिल्ह्यात सवतासुभा निर्माण करुन दिला. त्यांच्याविरुद्ध कोणी उभे राहू नये, यासाठी इतरांचे खच्चीकरण केले. राज्यात देशात मला पाठिंबा द्या, बाकी जिल्ह्यात, तालुक्यात तुमचे राज्य अशी स्थिती त्यांनी आपल्या समर्थकांना निर्माण करु दिली. त्यामुळे जेव्हा या तालुक्यातील, जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांची संस्थाने खालसा होऊ लागली, तेव्हा आपल्या संस्था, भ्रष्टाचार उघड होऊ नये, यासाठी शरद पवार काही करु शकणार नाहीत. इतकी वर्षे त्यांनी सांभाळले तरी आता त्यांच्या हातात काही नाही याची जाणीव या समर्थकांना झाली आहे. तसेच या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी, काँग्रेसचे सरकार येणार नाही ही वस्तूस्थिती त्यांच्या लक्षात आली. त्यामुळे ते आता भाजप, शिवसेनेमध्ये जाऊ लागले आहेत. त्यात पवार यांचे नातेवाईकही मागे राहिलेले नाहीत. त्यांना आपल्या निष्ठा, नातेसंबंध यापेक्षा आपले राजकारण आणि पुढील पिठीचे राजकीय भवितव्य जपणे अधिक महत्वाचे वाटत आहे. त्यातूनच शरद पवार यांनी ज्या प्रकारे आपल्या समर्थकांचा वापर कुरगुड्या करण्यासाठी केला. त्यांचाच कित्ता आता हे समर्थक गिरवित आपले राजकारण जिवंत ठेवण्यासाठी पवार यांचा हात सोडून जात असल्याचे म्हटले जात आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like