तुमचे एटीएम (ATM) कार्ड बदलले का ? ३१ डिसेंबर शेवटची तारिख

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मॅग्नेटीक स्ट्रीप असलेले जुने एटीएम कार्ड ३१ डिसेंबरपासून बंद होणार आहे. ऐनवेळी गैरसोय होऊ नये यासाठी सर्व ग्राहकांनी जुने कार्ड बदलून नवीन युरोपे, मास्टर कार्ड व विजा (ईएमव्ही चिप)युक्त एटीएम कार्ड घेण्याचे आवाहन बँकांनी केले आहे.

जुनी मॅग्नेटीक स्ट्रीपयुक्त कार्ड वापरताना पीनकोड वापरणे बंधनकारक नव्हते. ते फक्त मशिनवर स्वाईप करणे अपेक्षित होते. त्यामुळे एखाद्या ग्राहकाचे एटीएम कार्ड हरविल्यास कुणीही सहज त्या कार्डचा वापर करु शकत होते. विशेष बाब म्हणजे हरविलेल्या कार्डद्वारे अन्य कुणीतरी खरेदी केल्याने संबंधित ग्राहकांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे अनेक प्रकार घडत होते.

त्यामुळे इएमव्ही चिपयुक्त हे नवे कार्ड सुरु करण्यात आले आहे. या चिपमध्ये ग्राहकांची माहिती असून, ते कार्ड हरविल्यावरही त्याद्वारे डाटा चोरी होण्याची शक्यता नाही. रिजर्व्ह बँकेने सन २०१५मध्येच याबाबत एक परिपत्रक जारी केले होते. त्यामुळे त्यानंतरच्या काळात नव्या ग्राहकांना चिपयुक्त एटीएम कार्डच मिळत आहे. मात्र, अनेक ग्राहकांकडे जुने कार्ड असल्याने जुने कार्ड बदलवून नवीन कार्ड घेणे अपेक्षित आहे. या नव्या कार्डच्या दर्शनी भागाच्या डाव्या बाजूस चिप बसवलेली आहे. हे एटीएम-कम-डेबीट कार्ड ग्राहकांना नि:शुल्क दिले जात आहे.

३१ डिसेंबरनंतर सर्व जुनी मॅगस्ट्रीप आधारित एटीएम कम डेबिट कार्ड निष्क्रीय केली जाणार असल्याने त्यांचा वापर ग्राहकांना करता येणार नाही. नवे चिप आधारित कार्ड घेण्यासाठी ग्राहक संबंधित कोणत्याही जवळच्या शाखेत जाऊन नवे कार्ड प्राप्त करू शकतात, असेही बँकांनी कळविले आले.