मंत्री हसन मुश्रीफ यांचा भाजपावर निशाणा, म्हणाले – ‘केंद्राला साष्टांग नमस्कार करतो, पण…!’

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणांवर याचा मोठा ताण येत आहे. परिणामी, अनेक रुग्णांना आवश्यक त्या आरोग्यसेवाही देता येत नाहीत. त्यावरून आता राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी रेमडेसिव्हिरच्या पुरवठ्यावरून निशाणा साधला. हे इंजेक्शन भाजपलाच कसे मिळाले? सुजय विखे-पाटील विमानाने जातात. त्यांना इंजेक्शन मिळतात. हे चाललंय काय?, असा सवाल उपस्थित केला आहे.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघातील नागरिकांसाठी रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या शेकडो मात्रा आणल्या. त्यावरून आता त्यांच्यावर सत्ताधारी ठाकरे सरकारकडून टीका केली जात आहे. त्यामध्ये हसन मुश्रीफ म्हणाले, ‘खासदार सुजय विखे-पाटील यांनी काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र घेतले. रेमडेसिव्हिर इंजेक्शन आणण्यासाठी त्यांनी पत्र मिळवले. हिमाचल प्रदेशमधून त्यांनी 2 हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळवले. केंद्र सरकारचे नियंत्रण असताना हे इंजेक्शन त्यांना कसे काय मिळाले? त्यांचे वडील राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते रेमडेसिव्हिरचे वाटप कसे केले? त्यांनी प्रशासनाला ते द्यायला हवे होते. त्या रेमडेसिव्हिरची शुद्धता तपासली गेली का? अशी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली. त्यावर आता 29 एप्रिलला सुनावणी होणार आहे’.

दरम्यान, राज्यासह देशभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आरोग्य सेवा-सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामध्ये ऑक्सिजन/व्हेंटिलेटर बेड्स, कोरोना लस, रेमडेसिव्हिर इंजेक्शन यांसारख्या वैद्यकीय गोष्टींची गरज मोठ्या प्रमाणात भासत आहे. मात्र, याचे वितरण सुरळीत नसल्याने मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

इंजेक्शन भाजपलाच कसे मिळाले?

रेमडेसिव्हिर हे इंजेक्शन भाजपलाच कसे मिळाले? विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड हे दीव दमणला जातात आणि त्या कंपनीला भेटतात. 50 हजार इंजेक्शन त्यांना मिळतात. त्याचे पैसे भाजप द्यायला तयार होतो. सुजय विखे पाटील विमानाने जातात. त्यांना इंजेक्शन मिळतात. हे चाललंय काय?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.