चंद्रकांतदादांना हिमालयात जावे लागणार नाही, ग्रामविकासमंत्री मुश्रीफ यांनी लगावला टोला

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – मी आजही कोल्हापूरमधून निवडणूक लढवायला तयार आहे. जर कोल्हापुरातून निवडून आलो नाही, तर हिमालयात जाईन, असे सांगणाऱ्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil ) यांच्यावर राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी टीका केली आहे. चंद्रकांतदादांना हिमालयात जावे लागणार नाही. उलटं मी काल जे बोललो त्याला त्यांनी पृष्टीच दिली आहे, असा टोला हसन मुश्रीफ यांनी ट्विट करून लगावला आहे.

मुश्रीफ म्हणाले, की राज्यपालांबाबतच्या माझ्या वक्तव्याचे त्यांनी खंडन केले नाही, असं सांगतानाच कोल्हापूरमधून निवडून न आल्याबद्दल चंद्रकांतदादांवर टीका केली नव्हती. त्यांची इथे आम्हाला गरज आहे. चंद्रकांतदादा यांनी कोल्हापूरऐवजी पुण्यातील कोथरूडमधून विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढली होती. मात्र, तो विषय त्यांच्यासाठी नेहमीच अडचणीचा ठरला आहे. विरोधकांकडून या मुद्द्यावर पाटलांना सातत्याने टोमणे मारले जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले होते.

मुश्रीफ काय म्हणाले होते ?
राज्यपाल नियुक्त आमदारांची सरकारकडून येणारी नावे बाजूला ठेवली जाणार असल्याचा मोठा गौप्यस्फोट ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला होता. माझं आणि देवेंद्रजींचं बोलणं झालेले आहे. राज्यपालांशी त्यांची चर्चा झालेली आहे. ही आलेली यादी बाजूला काढून ठेवण्याचे ठरलेले असल्याचं पाटलांनी सांगितले, असे मुश्रीफ म्हणाले होते.

पाटील यांनी फेटाळला होता आरोप
दरम्यान, पाटील यांनी मुश्रीफ यांचा हा दावा फेटाळून लावला होता. हसन मुश्रीफ यांचे आरोप हास्यास्पद आहेत. हा राज्यपालांचा अवमान करण्याचा प्रकार असून लोकशाहीला घातक आहे. विनय कोरे यांच्या आईचं निधन झाले आहे. मी त्याठिकाणी त्यांच्या कुटुंबाच्या सांत्त्वनासाठी गेलो होतो. अशा ठिकाणी मी कसं असे बोलेन, असे पाटील म्हणाले होते.