विरोधी पक्षानं त्यांच्या काळात कधी सरसकट मदत दिली ? त्यांनी शपथेवर सांगावं : हसन मुश्रीफ

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन –  “आमचे सरकार अनेक वर्षे झाले सत्तेत होते. जनतेस कशी मदत मिळवून द्यायची हे आम्हाला चांगले माहिती आहे. आमची जनतेशी नाळ जुळली आहे. म्हणून आता आम्ही काय करावे, हे त्यांनी आम्हाला सांगण्याची गरज नाही, अशी टीका करतच विरोधी पक्षाने त्यांच्या काळात सरसकट कधी मदत दिली हे त्यांनी शपथ घेऊन सांगावे,” असे आव्हान अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी विरोधकांना दिले आहे.

पालकमंत्री मुश्रीफ यांनी आज (२२ ऑक्टोबर) पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली. ‘नुकसान झालेल्या भागाचे पंचनामे झाल्याशिवाय मदत करता येत नाही. पंचनामे झाल्याशिवाय सरकारला किती मदत करायची, याबाबत अंदाज लागत नाही. तसेच नुकसान झालेल्या भागाचे पंचनामे करावे, असा केंद्र सरकारचा सुद्धा आग्रह असतो,’ असे त्यांनी सांगितलं.

“मागील वर्षी कोल्हापुरात आलेल्या महापुरानंतर तत्कालीन मुख्यमंत्री सहा दिवसांनी पाहणी करण्यासाठी आले होते. तेव्हा सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांमध्ये त्यांच्या विरुद्ध प्रचंड राग मनात होता. यामुळे कोल्हापुरात एकही भाजपची विधानसभेची जागा निवडून आली नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना स्वतः कोथरुडला जाऊन निवडणूक लढवावी लागली,” असल्याचा चिमटा यावेळी मुश्रीफ यांनी काढला.

दरम्यान, पालकमंत्री हसन मुश्रीफ अतिवृष्टीच्या पाहणी दौऱ्यावर असताना संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी त्यांची गाडी रस्त्यात अडवून धरली. शेतकऱ्यांनी सडलेला कांदा आणि अन्य पिके त्यांच्या समोर धरत, आम्हाला तात्काळ नुकसान भरपाई द्या, अशी मागणी केली. त्यावर हसन मुश्रीफ यांनी आठ दिवसांमध्ये तुम्हाला नुकसान भरपाई मिळेल, असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले.