भाजपचा थयथयाट आणि नाटक; सुशिक्षित मतदारांनी मतपेटीतून उतरवला माज : हसन मुश्रीफ

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन – “महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून भाजपने केलेला थयथयाट आणि नाटक पाहून सुशिक्षित मतदारांनी मतपेटीतून भाजपचा माज उतरवला,” असा सणसणीत टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी लगावला. ते सिंधुदुर्गात बोलत होते.

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निकालावर एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना मुश्रीफ म्हणाले, “भाजपचा जो उन्माद आणि माज होता तो विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत जनतेने उतरवला. हे फक्त सरकारचे लक्ष विचलित करण्याचे काम करत आहे. आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित लढलो, तर भाजपचे डिपॉजिटही राहणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.

“वर्षभरात भाजपने अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण, अभिनेत्री कंगना रणाैत प्रकरण अथवा ईडी-सीबीआयचा गैरवापर करून विरोधकांना अडचणीत आणायचे काम केले, असा आरोप करतच कोरोना रुग्णाचे आकडे कमी झाले तरी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोरोना चाचण्या कमी झाल्या असे म्हणायचे. मृत्यू कमी झाले तर म्हणायचे मृत्यू लपवले. भाजपच्या या थयथयाटला पाहून लोक कंटाळली. या निवडणुकीत सुशिक्षित मतदारांनी भाजपला चोख प्रत्युत्तर दिले,” असे टीकास्त्र मुश्रीफ यांनी सोडले.
“कोरोना टाळेबंदी दरम्यान राज्याचे आर्थिक स्रोत बंद झाले होते, तरीही राज्य सरकारने कर्ज काढून शेतकऱ्यांना मदत केली. सरकारी कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्यास वेतन दिले, त्याची पोचपावतीच जनतेने दिली,” असेही हसन मुश्रीफ म्हणाले.