PM मोदींच्या वाढदिवशी सोशल मीडियात जे घडलं ते चूकच : रोहित पवार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – सोशल मीडियात सक्रीय असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे तरुण आमदार रोहित पवार यांनी अनेकदा विविध प्रश्नांवर नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. मात्र, काल पंतप्रधानांच्या वाढदिवशी बेरोजगार दिन पाळत मोदींना ट्रोल करण्याचा प्रकार त्यांना पटलेला नाही. पंतप्रधानांच्य जन्म दिनी त्यांच्या विरोधात हॅशटॅग चालवणे किंवा मिम वापरणे आपल्या भारतीय संस्कृतीला साजेसे नसून एक प्रकारे देशाच्या पंतप्रधान पदाचा अवमान आहे, अशा शब्दात रोहित पवार यांनी युवाशक्तीला फटकारलं आहे. रोहित पवार यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून आपलं म्हणणं मांडलं आहे.

काय म्हणाले रोहित पवार ?

ज्या युवा शक्तीच्या जोरावर आपण महासत्ता बनण्याचं स्वप्न आपण बघत होतो, आज ती युवाशक्ति बेरोजगारीच्या भयंकर संकटात अडकली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल 70 वा वाढदिवस साजरा केला, मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त समाज माध्यमातून राष्ट्रीय बेरोजगार दिवस पाळला गेला याचा मला खेद वाटतो. देशाच्या पंतप्रधानांच्या जन्मदिनी त्यांच्या विरोधात हॅशटॅग चालवणं किंवा मीम वापरणं आपल्या भारतीय संस्कृतीला साजेसं नाही.एकप्रकारे पंतप्रधान पदाचा हा अवमान आहे.

काल जे घटलं चुकीचं आहे

विशेषत: काल सोशल मीडियावर हॅशटॅग चालवणारे किंवा मीम वापरणारे हे ट्रोलर्स नसून वास्तविक जीवनातील बेरोजगारीच्या विळख्यात अकडेलेली युवा पिढी होती. मात्र, काल जे समाज माध्यमांवर घडलं ते चुकीचं आहे. त्यातून बेरोजगारी हा देशातील युवकांच्या समोरचा मोठा प्रश्न आहे आणि त्यामुळे युवक निराश झाले आहेत हे दिसून आलं.

सरकारला सुचवले उपाय

देशातील सध्याच्या औद्योगिक व आर्थिक स्तितीचं चित्र मांडताना त्यांनी केंद्र सरकारला काही उपायही सुचवले आहेत. जागतिक कामगार संघटने नुसार, कोरोना काळात जवळपास 41 लाख युवकांचे रोजगार गेले आहेत. सीएमआयच्या अहवालानुसार गेल्या वर्षभरात 2.10 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या असून आतापर्यंतच्या इतिहासातील ही सर्वाधिक सुमार कामगिरी आहे. देशातील युवक शिक्षण घेऊन बाहेर पडत आहेत. त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत. अशी दुर्दैवी परिस्थिती आज ओढावली आहे. दरवर्षी दीड कोटी युवक हे देशाच्या वर्कफोर्स मध्ये दाखल होत असतात. मात्र 65 ते 75 टक्के युवकांना अपेक्षित कौशल्य नसल्याने डिग्री असूनही अपेक्षित रोजगार मिळत नाही. एकूणच गेल्या काही वर्षात कौशल्य विकासावर फारसे काम झालेले नाही, हे स्पष्ट होते.