अनैतिक संबंधात ठरत होता अडथळा, प्रियकराच्या मदतीने तिने काढला पतीचा काटा

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन

अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने काटा काढल्याची धक्कादायक घटना कन्नड तालुक्यातील चिकलठाण येथे घडली आहे. अनेक दिवसापासून पोलिसांना गुंगारा देणारा प्रियकर ज्ञानदेव तुपे याला ग्रामीण पोलिसांनी अखेर गजाआड केले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, कन्नड तालुक्यातील घुसूर तांडा येथील शिवलाल बाळू राठोड याचा २२ मे रोजी शिवारात मृतदेह आढळला होता. डोक्यात दगडाचा मार व अन्य ठिकाणीही वार केल्यामुळे हा सारा प्रकार खुनाचा असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.
[amazon_link asins=’B076H2Z7LD’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5d449be4-7db5-11e8-9f18-552f7f23ed65′]
याप्रकरणी गोवर्धन नारायण राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात २३ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी अज्ञात असल्यामुळे पोलिसांनी तपास करत असताना खुनाची घटना घडल्यापासून नेवासा तालुक्यातील बुऱ्हाणपूर येथील ज्ञानदेव नामदेव तुपे हा इसम गायब असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती . प्राप्त माहितीनुसार रविवारी तो घोडेगाव येथे आल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली. पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग, उपनिरीक्षक एस. बी. कापुरे आदींनी शिताफीने तुपे यास गावातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने पोलिसांना सांगितले की, मृत शिवलाल राठोड याची पत्नी रंजनाबाई व त्याचे आंबा तांडा येथे ट्रॅक्टरवर काम करीत असताना सूत जुळले. दोघांमधील संबंधास रंजनाबाईचा पती शिवलाल याचा अडथळा होत होता. शिवलाल हा तिला दारू पिऊन मारहाण करीत असे. त्यामुळे ती त्याला वैतागली होती. तिने शिवलाल याला संपवण्याचा कट रचला आणि खून केला.

घटनेचा तब्बल सव्वा महिन्यांनी पोलिसांनी उलगडा केला असून , पोलीस मयत इसमाच्या पत्नीला अटक करण्यासाठी रवाना झाले आहेत.