हाथरस घटनेच्या निषेधार्थ पुण्यात ‘आम्ही पुणेकर’च्या वतीने मशाल, कँडल मार्च, नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – उत्तर प्रदेशातील हाथरस येथे एका दलित तरुणीची निर्घृण हत्त्या करण्यात आली, माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेच्या आणि उत्तर प्रदेश सरकारच्या घटनेच्या निषेधार्थ ‘आम्ही पुणेकर ‘ च्या वतीने आज (रविवारी) सायंकाळी मशाल, कँडल मार्च काढण्यात आला. सर्व थरातील नागरिकांचा यात उत्स्फूर्त सहभाग होता.

लाल महालातील राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून, अभिवादन करण्यात आले आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस, माजी आमदार आणि मशाल, कँडल मार्चचे संयोजक मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखाली मशाल, कँडल मार्च ला प्रारंभ झाला. त्यामध्ये आमदार सुनील टिंगरे, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे, शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, माजी आमदार दीप्ती चवधरी, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्षा स्वाती पोकळे, शिवसेना महिला प्रमुख सविता मते, शेतकरी कामगार पक्षाचे सागर आल्हाट, आम आदमी पार्टीचे शहर संयोजक मुकुंद किर्दत, लोकायतच्या अलका जोशी माजी महापौर दत्ता धनकवडे, माजी महापौर कमलताई व्यवहारे, सुभाष जगताप, अभय छाजेड, रोहित टिळक, रवि धंगेकर, विजय देशमुख, अमृत पठारे, कस्तुरी पाटील, पूजा रावेतकर, गोपाळ तिवारी, विरेंद्र किराड, रमेश अय्यर, गणेश नलावडे, महेश शिंदे, तानाजी लोणकर, प्रविण करपे, बाळासाहेब मालुसरे, आदी नेते, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. नागरिकांनी हातात राष्ट्रध्वज, मेणबत्त्या, मशाली घेतल्या होत्या. लोकायत संस्थेच्या युवक युवतींनी पथनाट्य आणि गीते सादर केली. मंडईतील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, आणि जाहीर सभेने सांगता करण्यात आली. पीडित तरुणीला श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

हाथरसमधील प्रकरणात देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येऊनही पंतप्रधान नरेंद्र मोदी अद्याप गप्प का? असा सवाल मोहन जोशी यांनी यावेळी बोलताना केला. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ही निव्वळ घोषणा राहिली असून महिलांचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत असेही मोहन जोशी यावेळी म्हणाले.

हाथरसचा प्रश्न हाताळताना उत्तर प्रदेश सरकारची भूमिका संशयास्पद राहिली. त्या दुर्दैवी मुलीवर पोलीस बंदोबस्तात रातोरात अंत्यसंस्कार करण्यात आले हा प्रकार संतापजनक होता. या प्रकरणाचा तपास सीबीआय कडे सोपविला असला तरी त्यातून खरे गुन्हेगार सापडतील का? या विषयी शंका आहे असे मुद्दे वक्त्यांनी भाषणात मांडले. या दुर्दैवी प्रसंगातून धडा घेऊन नागरिकांनी जागरुक रहावे असेही वक्त्यांनी यावेळी सांगितले. सभेचे प्रास्ताविक शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांनी केले. बाळासाहेब मारणे यांनी आभार मानले.