‘स्मृती इराणी योगींना बांगडया कधी पाठवणार ?’, काँग्रेसचा भाजपावर निशाणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  ‘जनेतला हे समजतंय की राहुल गांधींचा हाथरस दौरा हा केवळ राजकीय आहे, न्यायासाठी नाही’ अशी टीका केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केली होती. त्याला आता काँग्रेसचे महासचिव रणदीप सुरजेवाला यांनी जोरदार प्रत्युत्तर दिल आहे. ‘स्मृती इराणीजी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बांगड्या भेट म्हणून कधी पाठवणार ? असा सवाल करत सुरजेवाला यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

शनिवारी स्मृती इराणी यांनी राहुल यांच्या हाथरस दौऱ्यावर टीका करत म्हटलं होत की, ‘जनतेला हे समजतंय की राहुल गांधींचा हाथरस दौरा हा केवळ राजकीय स्वार्थासाठी आहे, न्यायासाठी नाही.’ जनतेला काँग्रेसच्या खेळी समजतात, म्हणूनच २०१९ मध्ये जनतेनं भाजपला ऐतिहासिक विजय मिळवून देण्याचं निश्चित केलं होतं, असे सांगत भाजप सरकार विषयी असलेला अभिमानही स्मृती इराणी यांनी व्यक्त केला होता. त्यावर काँग्रेस कडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

ट्विट करत रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं की, ‘श्रीमती स्मृती इराणीजी, तुम्ही केवळ इतकंच सांगा, आदित्यनाथ यांना बांगड्या भेट करण्यासाठी कधी जात आहात?’ असे म्हणत निशाणा साधण्यात आला.

‘पिडीतांचीच नार्को टेस्ट… हा तर मूर्खपणा’

‘हाथरस मध्ये पीडित दलित कुटूंबीयांची नार्को टेस्टची बातमी आदित्यनाथ सरकारच्या वेडसरपणाचा जिवंत पुरावा आहे. पीडित मुलीवर उपचार झाले नाहीत, ना तिला न्याय मिळाला. रात्री अडीच वाजता पीडित मुलीचा मृतदेह जाळण्यात आला. वडिलांना धमकी देण्यात आली. त्यांचा मोबाइल सुद्धा हिसकावून घेण्यात आला. गावात मीडिया जाऊ शकत नाही. अधर्मी योगी राजीनामा द्या’ असेही सुरजेवाला यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, शेतकरी संवाद कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी वाराणसीला पोहोचलेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणींना समाजवादी पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांना घेराव घातला. ”आम्ही इथे स्मृती इराणींना बांगड्या भेट देण्यासाठी आलोय. या बांगड्या त्यांनी पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यापर्यंत पोहचवाव्यात. हाथरस पीडित कुटुंबीयांचा आक्रोश आता त्यांच्यापर्यंत पोहचत नाही का की सत्तेत आल्यानंतर आता त्यांना महिलांचं दु:ख दिसणं बंद झालंय” असा प्रश्न समाजवादी पक्षाच्या नेत्या पूजा यादव यांनी उपस्थित केला.