Hathras Gangrape Case : अखेर मुख्यमंत्री योगींनी सोडलं मौन, म्हणाले- ‘दोषींना अशी शिक्षा मिळेल की ते उदाहरण बनेल !’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   उत्तर प्रदेशच्या हाथरसध्ये 19 वर्षीय तरुणीवर बलात्कार करून तिचा खून केल्याची घटना समोर आल्यानंतर आता पूर्ण देश संतापला आहे. पोलिसांनीही तिच्या मृतदेहावर रात्रीतून परस्पर अंत्यसंस्कार केले. या प्रकरणी पोलीस आणि प्रशासनानं घेतलेल्या भूमिकेमुळं योगी सरकारवर चहुबाजूंनी टीका होत होती. अखेर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणी मौन सोडलं आहे. ट्विट करत त्यांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे. दोषींना अशी शिक्षा मिळेल की ते उदाहरण बनेल असंही योगींनी म्हटलं आहे.

आपल्या ट्विटमध्ये योगी आदित्यनाथ म्हणतात, “उत्तर प्रदेशातील माता-भगिनींच्या सन्मानाला आणि स्वाभिमानाला धक्का पोहोचवणाऱ्यांचा संपूर्णत: नाश निश्चित आहे. या दोषींनी अशी शिक्षा मिळेल की, भविष्यात उदाहरण म्हणून दाखवलं जाईल. उत्तर प्रदेश सरकार प्रत्येक माता-भगिणींची सुरक्षा आणि विकासासाठी बचनबद्ध आहे. हाच आमचा संकल्प आणि वचन आहे.” असंही योगींनी म्हटलं आहे.

योगी सरकारवर या रेप केस नंतर चौफर टीका होत होती अनेकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. अनेक नेत्यांनीही योगी सरकारवर निशाणा साधला होता.

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी म्हणाल्या आहेत की, पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबियांना संरक्षण द्यायचं सोडून योगी सरकारनं त्यांच्या मानवी हक्कांवरच गदा आणण्याचं काम केलं. योगींनी राजीनामा द्यावा.”

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “देशात अराजक माजलं असून उत्तर प्रदेशसारख्या राज्यात मुली सुरक्षित नाहीत. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासोबत जे घडलं त्याबद्दल योगी आदित्यनाथ सरकारनं स्वत:ची चूक कबुल करावी. उत्तर प्रदेशात कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य राहिलं नसल्यानं योगींनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा” असंही त्यांनी स्पष्ट केलं.