हाथरस प्रकरण : मुख्य आरोपी गौरव ‘सपा’शी संबंधित, पीडिता म्हणते – ‘दहशतवादी आहे तो’

लखनौ : वृत्तसंस्था –   उत्तर प्रदेशातील हाथरस येथे एका मुलीने छेडछाडीची तक्रार दिल्यानंतर तिच्या वडिलांची हत्या करण्यात आली. त्यानंतर आता या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. विरोधकांनी याच मुद्यावरून उत्तर प्रदेश सरकारवर निशाणा साधला आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणातील आरोपींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी मृताच्या मुलीने मंगळवारी सांगितले, की मुख्य आरोपी हा समाजवादी पक्षाशी संबंधित आहे. तो एक दहशतवादी आहे. सोमवारी दुपारी साडेतीन वाजता गौरव त्याच्या साथीदारांसह शेतावर आला आणि त्याने माझ्या आणि आईसमोर वडिलांवर गोळी झाडली. तसेच पीडितेने सांगितले, की 16 जुलै, 2018 ला गौरवने घरात घुसून तिच्यासोबत छेडछाड केली. त्यामुळे वडिलांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर गौरवला 15 दिवस तुरुंगातही जावे लागले. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर गौरव बदला घेण्याच्या प्रयत्नात होता. तो तक्रार मागे घेण्यासाठी आमच्यावर दबाव टाकत होता. इतकेच नाही तर त्याने माझ्या वडिलांना जीवे मारण्याची धमकीही दिली होती.

अखिलेश यादव यांनी सरकारला घेरले

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी याच मुद्यावरून योगी सरकारला घेरले. हाथरसच्या मुलीवर झालेल्या अत्याचारानंतर आता हाथरसच्याच मुलीची छेडछाड झाल्याची ही बाब दुर्दैवी आहे. ‘बहुत हुआ महिलाओं पर अत्याचार, अबकी बार भाजपा बाहर!’, असेही ते म्हणाले.