तुम्हालाही आलाय का Paytm KYC अपडेटचा मेसेज, काही करण्यापुर्वी ‘हे’ नक्की वाचा

पोलिसनामा ऑनलाइन – सायबर ठग पुन्हा एकदा सक्रिय झाले असून ते मोबाईल वॉलेट अ‍ॅप युजर्सना लक्ष्य करत आहेत. पेटीएम केवायसीच्या नावावर गुरुग्राममधील सेक्टर-१४ पोलिस स्टेशन परिसरातील जुन्या डीएलएफ कॉलनीत राहणाऱ्या प्रवीण मेहंदीरता यांना ४० हजार रुपयांना गंडवले, तर सेक्टर-१७ पोलिस स्टेशन परिसरातील ओएलएक्सवर सोफा विक्री प्रकरणात नय्यर आसिफ जमाल यांचेही ४३,००० रुपयांचे नुकसान झाले आहे. सायबर पोलिस ठाण्यात शिवशक्ती अपार्टमेंट सेक्टर-५४ मधील उपमा जैन यांच्या तक्रारीवरून १.१५ लाख रुपयांच्या ऑनलाइन फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे घोटाळेबाज मोबाईल वॉलेट वापरणार्‍या लोकांना केवायसीच्या नावावर असलेल्या खात्याविषयी माहिती गोळा करतात आणि नंतर त्यांची फसवणूक करतात. पेटीएम केवायसीच्या नावाने सायबर ठग युजर्सच्या मोबाइल नंबरवर बनावट संदेश पाठवतात. ठग मेसेजद्वारे युजर्सना केवायसी अपडेट करण्याचा इशारा देत म्हणतात की आपण केवायसी अपडेट करा नाही तर आपले खाते ब्लॉक केले जाईल.

आपले खाते ब्लॉक होण्याच्या भीतीने, जेव्हा युजर्स मेसेजमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करतात तेव्हा सायबर ठग त्यांची माहिती चोरतात. जर तुम्हालाही केवायसी अपडेट करण्याविषयी मेसेज आला असेल तर प्रथम पेटीएमशी संपर्क साधा आणि त्याबद्दल माहिती घ्या. जर कंपनी याबाबत कोणतीही माहिती देत नसेल तर मग समजून घ्या की हा मेसेज बनावट आहे.