हवेली, मुळशी तालुक्यातील दस्त नोंदणी पुन्हा सुरु करा ! संदीप खर्डेकर यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महापालिका हद्दीत वाढ करुन उर्वरित २३ गावे महापालिकेत समाविष्ट करण्याची कार्यवाही सुरु केली आहे. जिल्ह्यातील अन्य तालुक्यात दस्त नोंदणी सुरु असताना केवळ हवेली आणि मुळशी तालुक्यातील दस्त नोंदणी थांबविली आहे. ही दस्त नोंदणी तातडीने सुरु करावी, अशी मागणी क्रिएटिव्ह फाऊंडेशनचे संदीप खर्डेकर यांनी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

पुणे शहराच्या लगतच्या गावांमध्ये हजारो नागरिकांनी फ्लॅट बुक केले आहेत. त्यासाठी कर्ज काढले असून हप्तेही सुरु झाले आहेत. या गावांमध्ये अनधिकृत बांधकामांबरोबर हजारो इमारती आज बांधून तयार आहेत. मात्र, या दोन तालुक्यातील दस्त नोंदणी बंद करण्याचा रेराने निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेक नागरिक उद्धवस्त होत आहे. दस्त नोंदणी थांबवणे कोणत्याही कायद्यात बसत नाही, असे तज्ञांचे मत आहे. तसेच निकाल ही उच्च न्यायालयाने यापूर्वी दिले आहेत. त्यामुळे एकवेळ यात अनधिकृत बांधकाम करणार्‍याचा विचार करु नका पण हजारो नागरिकांनी बुक केलेल्या फ्लॅटची दस्त नोंदणी थांबल्याने त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. सामान्य नागरिकांना कोणीच वाली नाही आणि दस्त नोंदणी होत नसल्याने त्यांच्या कर्जाचे अंतिम डिसबस्टमेंट disbursement होत नाही. बैठ्या घरांची ही खरेदी विक्रीची दस्तनोंदणी होत नसल्याने असंख्य जण त्रस्त झाले आहेत.

शासनाने एक डेडलाईन ठरवून त्यानंतर रेराच्या परवानगीशिवाय होणार्‍या बांधकामांची नोंदणी होणार नाही असे निश्चित करावे. त्यामुळे यापूर्वी ज्या शेकडो इमारती ग्रामीण भागात उभ्या आहेत. त्यांना न्याय मिळू शकेल. त्यामुळे हवेली, मुळशीतील दस्त नोंदणी बंदी तत्काळ मागे घ्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.