पूर्व हवेलीत नैसर्गिक ओढ्याचा प्रश्न गंभीर

थेऊर – पूर्व हवेलीत नैसर्गिक ओढ्यावरील अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा अधोरेखित झाला असून परतीच्या पावसाने सर्वांचे पितळ उघडे पाडले आहे परिणामी या ओढ्याचे पाणी इतरत्र पसरल्याने मोठे नुकसान सहन करावे लागले आहे.

गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसाने पूर्व हवेलीतील अनेक गावात पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली याला केवळ नैसर्गिक ओढ्यावरील अतिक्रमण हेच होय. पुणे शहरालगतच्या गावामध्ये जमीनीची किंमत प्रचंड वाढल्याने अनेक शेतकरी व जमिनीच्या सुधारकांनी नैसर्गिक ओढ्याची रुंदी कमी केली तसेच अनेक ठिकाणी छोट्या नळ्या टाकून ओढे बंद केले.गेल्या अनेक वर्षांपासून या भागात मोठा पाऊस झाला नाही त्यामुळे या ओढ्याला पूर आला नाही परंतु यावर्षी बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पटट्यामुळे दक्षिण भारतासह महाराष्ट्रात प्रचंड पाऊस झाला.पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागातही याचा फटका बसला.

पूर्व हवेलीतील कोलवडी लोणी काळभोर कुंजीरवाडी आळंदी म्हातोबा उरुळी कांचन वळती शिंदवणे या गावातही पावसाने मोठे नुकसान केले.कोलवडी येथील केसनंद गावाकडून येणारा ओढा असाच अरुंद केल्याने यात आलेल्या पुराच्या पाण्याने आपला प्रवाह बदलून अनेक हेक्टर उभ्या पिकांचे नुकसान केले यासाठी जबाबदार असलेल्या व्यक्तीवर कारवाई करण्यात आली पाहिजे अशी मागणी स्थानिक शेतकर्यांनी केली आहे.

यावर सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्हाधिकारी यांनी महसूल विभागाकडे याची माहिती मागवल्याचे समजते.परंतु हा प्रश्न गंभीर असल्याने यावर केवळ वेळ मारुन चालणार नाही तर योग्य पावले उचलून नैसर्गिक प्रवाह पूर्ववत झाले पाहिजेत अन्यथा भविष्यात यापेक्षा मोठ्या जीवीत व वित्त हानी होऊ शकते.