हवेली पोलीस ठाण्याचा पुणे शहर आयुक्तालयात होणार समावेश, प्रस्ताव तयार करण्याचं काम सुरू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –   सिंहगड रस्त्यावर असणाऱ्या पुणे ग्रामीण पोलीस दलातील हवेली पोलीस ठाण्याचा पुणे शहर आयुक्तालयात समावेश करण्यात येणार आहे. याबाबत प्रस्ताव तयार करण्याचं काम सुरू आहे. हवेली तालुक्यातील 17 गावं ही पुणे शहर पोलीस दलात येण्याची शक्यता आहे. हवेली पोलीस ठाण्यासाठी नांदेड सिटी येथे 15 गुंठे जागाही उपलब्ध करण्यात आली आहे.

शहरालगत असणाऱ्या गावांमध्ये वाढत्या लोकसंख्येचा ताण वाढत आहे. कायदा आणि सुववस्था अबाधित राखण्यासाठी पुणे ग्रामी पोलीस दलातील काही भागाचा पुणे पोलीस आयुक्तालयात समावेश करण्यात येणार आहे. लोणी काळभोर, लोणीकंद पोलीस ठाण्याबरोबरच हवेली पोलीस ठाण्याचा समावेश करण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली आहे.

हवेली पोलीस ठाण्यांतर्गत नांदेड, किरकटवाडी, खडकवासला, डोणजे अशा 17 गावांचा समावेश आहे. असं असलं तरीही किती गावं ही नव्यानं पुणे आयुक्तालयात येणार हे गुलदस्त्यात आहे. तरीही ही गावं शहरालगत असून या गावांचं शहरीकरण होत आहे. स्वस्तात फ्लॅट मिळतात म्हणून अनेक नोकरदारांनी या ठिकाणी फ्लॅट घेतले आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळं, रस्ते, वाहतूक अशा समस्या निर्माण होत आहेत. या भागांचं मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण होत आहे.

पुणे शहराचा विस्तार पाहता आणखी एका परिमंडळाची आवश्यकता असून शहर पोलीस दलातील विभागाची फेररचना करण्यात येणार असल्याचं समजत आहे. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या ग्रामीण पोलीस दलात समावेश असणारं हवेली पोलीस ठाणं हे अभिरूची मॉल समोर असलं तरी लवकरच हवेली पोलीस ठाणं हे नांदेड सिटी येथील प्रशस्त जागेत हलवण्यात येणार आहे.