अखेर हवेलीचे तहसीलदार नुकसानग्रस्त भागाच्या दौर्‍यावर

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन (शरद पुजारी) –  परतीच्या पावसाने पूर्व हवेलीतील गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान केल्यानंतर अनेक दिवसापासून शेतकरी व नागरिक महसूली अधिकारी तहसीलदार सुनील कोळी यांची चातकासारखी वाट पाहत होते अखेर आज प्रत्यक्ष ते या भागाचा दौरा करण्यासाठी पोहोचले आणि या शेतकऱ्यांनी आपल्या अडचणींचा पाढाच त्यांच्यापुढे वाचला.

यावेळी पंचायत समिती सभापती हेमलता काळोखे, पंचायत समिती सदस्य युगंधर काळभोर,हेमलता बडेकर, थेऊरचे गावकामगार तलाठी दिलीप पलांडे, लोणी काळभोरचे तलाठी दादासाहेब झेंजे,लोणी काळभोरच्या उपसरपंच सिमा काळभोर, कृषी सहाय्यक बालाजी पाटील, थेऊरचे ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब कांबळे, माजी सरपंच नंदा यशवंत कुंजीर, तसेच महेश भोसले, आण्णासाहेब काळभोर,शरद काळभोर, संभाजी कुंजीर यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

ऑक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस चालू झाला याची तिवृता इतकी भयानक असेल याची कोणीच कल्पना केली नव्हती कारण गेल्या पंधरा ते वीस वर्षात एवढ्या मोठ्या प्रमाणावर तो आलाच नाही परंतु यावर्षी त्याचा मुक्काम नोव्हेंबर महिना उजाडला तरीही त्यात कमी होताना दिसत नाही. या भागातील आळंदी म्हातोबा तरडे वळती शिंदवणे उरुळी कांचन लोणी काळभोर थेऊर कुंजीरवाडी या सगळ्या गावात आवर्षणाची परिस्थिती निर्माण झाली. शेतकर्याचे प्रचंड नुकसान झाले.

यावर महसूल कृषी व प्रशासन या तिन्ही विभागाकडून संयुक्त पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. परंतु हवेलीचे तहसीलदार मात्र कुठे दिसलेच नाहीत यामुळे शेतकरी वर्गात मोठी नाराजी दिसून आली.अनेक ठिकाणी ओढ्याचे अस्तित्व संपवून टाकल्याने पुराचे पाणी उभ्या पिकात शिरले.थेऊर लोणी काळभोर या गावच्या शिवेवर असलेल्या शेतात घरात पाणी शिरले गेल्या महिन्यापासून हे पाणी असेच वाहत आहे त्यामुळे उभ्या ऊसात पाच फुटापर्यंत खोल खड्डे पडलेले आहेत. नुकसानगृस्त पिकामध्ये केवळ तरकारी पिकांचे पंचनामे होत असल्याने येथे झालेल्या उसाच्या नुकसानीची मदत कोण देणार हा प्रश्न येथील शेतकर्यांना पडला आहे.

येथील ओढ्याचा प्रश्न गंभीर असल्याने यावर शासकीय पातळीवर याची माहिती घेऊन नकाशाच्या आधारे तो पूर्ववत करावा यामध्ये कोणत्याही अडचणी निर्माण होणार नाहीत असे पंचायत समिती सदस्य युगंधर काळभोर यांनी सांगितले.केवळ आश्वासन नको परंतु कारवाई व्हावी संबंधित सर्वे नंबरची मोजणी करुन सातबारा नुसार क्षेत्र निघाले तर ओढा आपोआप मोकळा होऊ शकतो असे थेऊरच्या माजी सरपंच नंदा यशवंत कुंजीर यांनी मत मांडले.

यावर सभापती हेमलता काळोखे यांनी तहसीलदार सुनील कोळी यांना यावर तत्परतेने कारवाई करावी अशा सूचना दिल्या. यावेळी तहसीलदार सुनील कोळी यांनी गावकामगार तलाठी यांना यावर दोन दिवसात अहवाल सादर करावा त्यानंतर गुरुवारी यावर एक बैठक घेऊन हा विषय मार्गी लाऊ असे सांगितले.

Visit : Policenama.com