अमरावतीत आमदारासह 33 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, प्रशासनाकडून 2 दिवस कडक संचारबंदी

अमरावती :  अमरावती जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अमरावतीची कोरोनाबाधित रुग्णांचे आकडे हजाराकडे पोहचलेत. अमरावती शहरात शिक्षक मतदारसंघाचे आमदार श्रीकांत देशपांडे यांनाहि कोरोनाची लागण झाली आहे. आमदार देशपांडे यांच्यासह 33 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 828 झाली असून तर, आतापर्यंत 30 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात दोन दिवस कडक संचारबंदीचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले असून कर्फ्यूसाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त असणार आहे.

शहरात चार रॅपीड टेस्ट सेंटरमध्ये कोरोनाची चाचणी होत आहे. त्यामुळे तातडीने रुग्णांचे अहवाल मिळत आहेत, यामुळे उपचार करायला आरोग्य यंत्रणेला सोयीस्कर होत आहे. आतापर्यंत 565 रुग्णांनी कोरोनावर मात केलीय. तर सध्या 233 रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

सुमारे 1200 कर्मचारी आणि 127 अधिकारी बंदोबस्ताच्या कामात व्यग्र आहेत. अमरावती जिल्ह्यामध्ये कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण वाढत असल्याने शनिवार आणि रविवार असे दोन दिवस संचारबंदीचे आदेश काढले आहेत.

कर्फ्यूचा पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त संजीव कुमार बाविस्कर हे बंदोबस्तासाठी स्वतः रस्त्यावर उतरले आहेत. शहरात 48 ठिकाणी कडक बंदोबस्त लावला आहे. या बंदोबस्तासाठी बाराशे कर्मचारी आणि 127 अधिकारी लावल्याचे पोलीस आयुक्त संजीव कुमार बाविस्कर यांनी सांगितले.

कोरोना रुग्णाच्या संखेत वाढ होत असल्याने कोरोना रुग्णाची संख्या नियंत्रणात राहावी म्हणून जिल्ह्या प्रशासनाकडून दोन दिवसाची संचारबंदी लावली आहे. यामध्ये शहरातील सर्व दुकाने बंद राहणार असून घराबाहेर विनाकारण फिरणार्‍या लोकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे. शहरांमध्ये ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवला आहे.