आता वाहनांना असणार हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ; ‘या’ तारखेपासून नवीन नियम लागू 

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – अनेकदा वाहनांच्या नबंर प्लेटचे गैरप्रकार होताना दिसतात. आता लवकरच या गैरप्रकारांना आळा बसणार आहे. आता नंबर प्लेटच्या सुरक्षेसाठी आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी १ एप्रिल २०१९ पासून नव्या वाहनांना ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट’ (एच.एस.आर.पी.) असणार आहे. उत्पादकांकडून मिळणाऱ्या वाहनांवर डीलर  ‘टेम्पर प्रूफ हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’ व ‘थर्ड रजिस्ट्रेशन मार्क’सहित उपलब्ध करून देण्यात येणार आहे.  मुख्य म्हणजे जी जुनी वाहने आहेत त्यांनाही लवकरच या नंबर प्लेटसाठी सक्ती केली जाणार आहे.
दरम्यान, केंद्रीय मोटारवाहन नियम १९८९च्या नियम ५० अनुसार वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट विहीत नमुन्यात बसविण्याची तरतूद आहे. मुख्य म्हणजे परिहन विभाागाने या नंबर प्लेटचे उत्पादन, पुरवठा व छपाई व वाहनांवर बसवण्यासाठी २०१३ मध्ये निविदा मागविली होती. इतकेच नाही तर, ही नंबर प्लेट राज्य शासनाने नियुक्त केलेल्या सेवापुरवठादारामार्फत नोंदणी प्राधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आरटीओ कार्यालयाच्या परिसरात बसवण्यात येणार होत्या.
दरम्यानच्या काळात काही राज्यात या नंबर प्लेटसारखी दिसणारी नंबर प्लेट बसवल्या जात आहेत अशा तक्रारीही समोर येताना दिसल्या. या तक्रारी वाढल्या होत्या. अखेर डीलरकडून विक्री होणाऱ्या सर्व वाहनांना ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट’ अनिवार्य करण्याची सूचना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
निळ्या रंगाच्या चक्राचे असणार होलोग्राम
या हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट्स अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने बनवण्यात येणार आहेत. मुख्य म्हणजे या नंबर प्लेट्स टॅम्परप्रूफ असणार आहेत. एकदा का हाय  सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट्स वाहनांवर बसवल्या की त्या पुन्हा काढता येणार नाही. मुख्य म्हणजे, एका विशिष्ट क्लिपद्वारे या नंबर प्लेट वाहनांना लावण्यात येणार आहेत.  ही प्लेट अॅल्युमिनिअमपासून तयार केलेली असणार आहे. या नंबर प्लेटवर निळ्या रंगाच्या चक्राचे होलोग्राम असणार आहे. सोबतच वाहन क्रमांकाच्या काळ्या तिरप्या ओळीत ‘इंडिया’ असे  इंग्रजीत लिहिलेले असणार आहे.
डीलरच देतील जुन्या वाहनांना ‘एचएसआरपी’
राज्यात १ एप्रिलपासून डीलरकडून उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या नवीन वाहनांना ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट’ (एचएसआरपी) असणार आहे. जुन्या वाहनांनाही डीलरच या नंबर प्लेट लावून देतील. या नंबर प्लेटमुळे गैरप्रकारांना आळा बसेल अशी माहिती परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी दिली आहे.