‘Bois locker room’ सारखे ग्रुप हटवण्याबाबत उच्च न्यायालयानं केंद्रसह इतरांकडून मागवलं उत्तर

नवी दिल्ली – सोशल मीडिया हा आता आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे. अगदी लहान मुलांपासून आजी-आजोबांपर्यंत सगळेच कुठल्या ना कुठल्या तरी सोशल माध्यमाशी जोडलेले असतात. सोशल मीडिया हे मनातील भावना व्यक्त करण्यासाठीचं चांगलं साधन झालं आहे. पण त्याचबरोबर सतत त्याला चिकटून राहणारी नवी शाळेतील पिढी विनाशाकडे जात नाही ना याकडे मात्र लक्ष दिलं जात नाही. दक्षिण दिल्लीतही अतिशय घाणेरड्या भाषेत सामूहिक बलात्काराची चर्चा करणाऱ्या इन्स्टाग्रामवरील ‘Bois locker group’बद्दलची माहिती सोशल मीडियातूनच उघड झाल्यावर सगळीकडेच हाहाकार उडाला. या प्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. देशातील शालेय मुलांच्या हितांच्या रक्षणासाठी अशाप्रकारचे सोशल मीडियावरील ग्रुप का काढून टाकू नयेत? या प्रश्नाचे उत्तर उच्च न्यायालयाने केंद्र सरकार, फेसबुक, गूगल आणि ट्विटरला मागितले आहे. या सर्वांची उत्तरे आल्यावर पुढे सुनावणी केली जाईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. या ग्रुपवर झालेल्या घाणेरड्या चर्चेने नीतिमत्ता कुठपर्यंत खालावली आहे याबाबत इंटरनेटवर चर्चा सुरू आहे.