खडसेंना न्यायालयाचा दणका : अंजली दमानिया यांच्याविरोधातील ३२ पैकी २१ खटल्यांना स्थगिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ऐन निवडणूकीच्या तोंडावर भाजपचे माजी मंत्री एकनाथ खडसेंना मुंबई उच्च न्यायालयाकडून धक्का मिळाला आहे. एकनाथ खडसे यांच्या समर्थकांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याविरोधात दाखल केलेल्या अब्रु नुकसानीच्या खटल्यास मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. ३२ पैकी २१ खटल्यांना बुधवारी हायकोर्टाने स्थगिती दिली. तर, उर्वरीत ११ खटल्यांसंदर्भात दमानिया यांनी स्वतंत्र याचिका दाखल करवी, असे निर्देश न्यायायलायने दिले आहेत.

अंजली दमानिया यांनी खडसेंनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात तक्रारी आणि याचिका दाखल केल्या होत्या. त्यानंतर प्रसारमाध्यमे आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. त्यामुळे एकनाथ खडसे यांना राजकीय वनवास भोगावा लागत आहे. तसेच भोसरी येथील भूखंड प्रकरणात एकनाथ खडसे यांना आपल्या पदाचा राजीनामाही द्यावा लागला होता. दरम्यान, एकनाथ खडसे समर्थकांनी अंजली दमानिया यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकला होता.

राज्यभरात जळगाव, नाशिक, धुळे, बुलडाणा, जालना आणि नंदुरबार अशा सहा जिल्ह्यांमध्ये मिळून एकूण ३२ अब्रूनुकसानीचे खटले अंजली दमानिया यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आले होते. त्यापैकी २१ खटल्यांना बुधवारी हायकोर्टाने स्थगिती दिली.