HCL च्या रोशनी नादर देशातील सर्वात ‘श्रीमंत’ महिला, बायोकॉनच्या किरण मजूमदार शॉ दुसर्‍या क्रमांकावर, जाणून घ्या इतरांची क्रमवारी

मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : देशातील सर्वात श्रीमंत महिलांमध्ये एचटीएल टेक्नोलॉजीज (HCL Technologies) या दिग्गज आयटी कंपनीच्या रोशनी नादर मल्होत्रा पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांच्याकडे 54,850 कोटी रुपयांची संपत्ती आहे. यानंतर बायोकॉनच्या किरण मजूमदार शॉ यांचा क्रमांक लागतो. त्यांच्याकडे 36,600 कोटी रुपयांची संपत्ती आहे. गुरुवारी जाहीर केलेल्या एका अहवालात असे म्हटले गेले आहे. हुरुन इंडिया आणि कोटक वेल्थ द्वारे तयार केलेल्या अहवालानुसार किमान 100 कोटी संपत्तीच्या 100 धनकुबेरांच्या यादीमध्ये 31 महिला ‘सेल्फ-मेड’ श्रेणीतील आहेत, यात सहा प्रोफेशनल मॅनेजर आणि 25 उद्योजिका आहेत.

‘सेल्फ मेड’ प्रकारात शॉ प्रथम क्रमांकावर आहेत. त्यापाठोपाठ 11,590 कोटी रुपयांच्या संपत्तीसह झोहो (Zoho) च्या राधा वेम्बू यांचा क्रमांक लागतो. या यादीमध्ये 10,220 कोटी रुपयांच्या संपत्तीसह जयश्री उलाल तिसर्‍या स्थानी आहेत. येथे मजेशीर गोष्ट म्हणजे शॉ, उलाल आणि वेम्बू या तिघांची नावे हुरूनने तयार केलेल्या जागतिक यादीमध्ये देखील आहेत.

या अहवालानुसार या यादीमध्ये समाविष्ट महिलांचे सरासरी वय 53 वर्षे आहे. त्याच वेळी 40 वर्षाखालील 19 महिला यामध्ये आहेत. या यादीमध्ये नायका (Nykaa) च्या फाल्गुनी नय्यरचा समावेश आहे. त्यांची मालमत्ता 5,410 कोटी रुपये आहे. यात बायजु (Byju) च्या दिव्या गोकुळनाथचा देखील समावेश आहे. त्यांच्याकडे 3,490 कोटींची संपत्ती आहे.

देशातील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीमध्ये काही कुटुंबातील एकापेक्षा जास्त महिला उद्योजिकांचा समावेश आहे. या यादीमध्ये अपोलो हॉस्पिटल एन्टरप्राइझ (Apollo Hospitals Enterprise) च्या चार महिला आणि गोदरेज समूहाच्या तीन महिलांचा समावेश आहे. या अहवालानुसार या यादीतील श्रीमंत महिलांमध्ये फार्मास्युटिकल व्यवसायाशी संबंधित 13 महिला, कापड व वस्त्र उद्योगाशी संबंधित 12 महिला आणि आरोग्याशी संबंधित नऊ महिलांचा समावेश आहे.