HCMTR वर्तुळाकार मार्गाची पुर्नरचना करावी, शिवसेनेची महापालिका आयुक्तांकडे मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात होवू घातलेल्या एचसीएमटीआर मार्ग (अंतरवर्तुळाकार रस्ता) हा १९८७ च्या विकास आराखड्यानुसार करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. विशेष असे की आराखडा करतेवेळी हा एचसीएमटी मार्ग त्यावेळच्या शहराच्या बाह्य भागातून होता. ३२ वर्षात या मार्गाच्या भोवती अनियमीत विकास झाल्याने अधिकाअधिक नागरी वापराकरिता या मार्गाची पुनर्रचना करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे.

शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. याप्रसंगी शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब ओसवाल, विशाल धनवडे, पल्लवी जावळे उपस्थित होत्या. सुतार म्हणाले, की एचसीएमटीआर मार्गाचे ३२ वर्षांपुर्वीच्या आराखड्यानुसार नियोजन करण्यात येत आहे. मागील काळात या मार्गावर बरेच ठिकाणी अतिक्रमण झाले असून शासनाच्या विविध विभागांची जागा यासाठी लागणार आहे. तसेच ३६ कि.मी.च्या या मार्गावर रस्त्यावर जाण्यासाठी व उतरण्यासाठी ३२ ठिकाणी रॅम्प करण्यात येणार आहेत. या प्रकल्पासाठी सुमारे आठ हजार कोटी रुपये खर्च येणार असून मोठ्या प्रमाणावर भूसंपादन करावे लागणार असून झाडेही तोडावी लागणार आहेत.

सद्यस्थितीमध्ये शहरात मेट्रो मार्गांचे काम सुरू आहे. भविष्यात मेट्रोचे जाळेही विस्तारत आहे. अशा परिस्थितीत मेट्रो मार्ग आणि उन्नत एचसीएमटीआर मुळे वाहतुकीत सुधारणा होण्याऐवजी वाहतुक कोंडीच होण्याची शक्यता असून हा प्रकल्प अव्यवहार्य ठरण्याचीच भिती अधिक आहे. या पार्श्‍वभूमीवर या मार्गाचा पुढील पन्नास वर्षांचा विचार करून आराखडा तयार करावा आणि नंतरच त्याचे काम हाती घ्यावे, अशी आमची मागणी आहे. कुठलाही प्रकल्प करत असताना किमान ८० टक्के जागा ताब्यात असणे आवश्यक आहे. कुठल्याही शासकीय विभागाने अद्याप त्यांची जागा ताब्यात दिलेली नाही. तसेच खाजगी जागांचेही भूसंपादन करण्यात आलेले नाही. असे असताना प्रशासनाने टेंडर प्रक्रिया राबविली आहे. कोणाच्या तरी फायद्यासाठी पुणेकरांना खड्यात घालण्याचा हा प्रयत्न आहे. एचसीएमटीआर प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध नाही. परंतू चुकीच्या पद्धतीने हा प्रकल्प पुढे नेण्यास आमचा विरोध राहील, असे निवेदन आयुक्तांना दिल्याचे पृथ्वीराज सुतार यांनी नमूद केले आहे.