कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामींनी घेतला जीवनातील ‘हा’ मोठा निर्णय ; म्हणाले, चुकून CM झालो

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्नाटचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी आज एक मोठे वक्तव्य करत राजकारणातून संन्यास घेण्याचा विचार करत असल्याचे सांगितले. त्यांनी सांगितले की, मी चुकून राजकारणात आलो होतो आणि मुख्यमंत्री देखील चुकूनच झालो. त्यांनी म्हटले कि, देवाने मला दोनवेळा मुख्यमंत्री होण्याची संधी दिली आणि त्यानुसार मी १४ महिने राज्याच्या विकासासाठी मनापासून आणि चांगले काम केले. मी आपल्या कामाबाबत समाधानी असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

एचडी कुमारस्वामी यांनी म्हटले की, ‘सध्याचे राजकारण कोणत्या दिशेने जातेय. यावर मी विचार करत असून ते चांगल्या लोकांसाठी नसून पूर्णतः जातिव्यवस्थेवर आधारित असल्याचे माझ्या लक्षात येत आहे. आता मी पद सोडले असल्याने मला यात ओढू नये. आता मला शांतीने राहू द्यावे. कारण इथून पुढे मला राजकारणात राहण्याची अजिबातही इच्छा नाही. जेव्हा सत्तेत होते तेव्हा मी माझ्या परीने चांगले काम केले. आता मला लोकांना शांतीने जगताना पाहायचे आहे.’

नुकत्याच काही दिवसांपूर्वी कर्नाटकातील कांग्रेस आणि जनता दल सेक्युलर (जेडीएस) आघाडीचे कुमारस्वामी यांच्या नेतृत्वातील सरकार कोसळले. दोन्ही पक्षांच्या अनेक आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर सरकार अल्पमताच्या संकटात आले. विरोध पक्षांच्या जोरदार मागणीनंतर विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी घेतलेल्या मतदानात कुमारस्वामी बहुमत मिळवू शकले नाहीत. कुमारस्वामींच्या बाजूने ९९ तर विरोधात १०५ मते पडली. त्यानंतर सरकार कोसळले.

त्यानंतर भाजपाने येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले आहे. यावर काँग्रेसने कडाडून टीका केली असून “कर्नाटकात लोकशाहीची हत्या केली जात आहे. पुरेशी आमदार संख्या नसतानाही बी. एस. येडियुरप्पा सत्ता स्थापनेचा दावा कसा करु शकतात? घटनेचं रक्षण करणारे राज्यपाल या गोष्टीला मान्यता कसे देऊ शकतात? कायद्याचं राज्य नेमकं कुठंय?” असे म्हटले होते. या घडामोडीनंतर कुमारस्वामी मात्र चांगल्याच नैराश्येत गेल्याचे दिसत असून राजकारणातून संन्यास घेण्याची भाषा करत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त