Pan Card ला Aadhaar Card लिंक करा असा बँकेचा मेसेज आला तर दुर्लक्ष करू नका, अन्यथा बसेल 1 हजाराचा फटका

नवी दिल्लीः पोलीसनामा ऑनलाइन – केंद्र सरकारने आता पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले आहे. येत्या 30 जूनपर्यंत पॅन कार्डला आधार कार्डशी लिंक करण्याची मुदत दिली आहे. हे काम तातडीने करून घ्या. कारण आता या कामासाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमी आहे. आधार कार्ड लिंक नसेल, तर मुदतीनंतर दंडही भरावा लागणार आहे. आता बँका देखील पॅन कार्ड आधारला लिंक करण्याबाबत ई-मेल किंवा एसएमएस ग्राहकांना पाठवत आहेत. त्यामुळे तुमच्या बँकेचा यासाठीचा मेल किंवा एसएमएस आला तर त्याकडे दुर्लक्ष करु नका.

केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (CBDT) पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी 30 जून 2021 पर्यंत मुदत दिली आहे. कर विभागाच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी ही अखेरची मुदत आहे. या मुदतीत लोक पॅन अन् आधार कार्ड लिंक करणार नाहीत, त्यांच्याकडून दंड वसुल केला जाणार आहे. आयकर कायद्याच्या नियमानुसार, येत्या 30 जूनपर्यंत पॅन आणि आधार कार्ड लिंक केले नाही, तर तुम्हाला 1 हजार रुपयांपर्यंत दंड द्यावा लागणार आहे. पॅन आणि आधार कार्ड लिंक न केल्यास दंड आकारणीसाठी सरकारने आयकर कायद्यात नवीन कलम 234H जोडला आहे.

पॅन अन् आधार कार्ड लिंक करण्याची सोपी पध्दत –
पॅन आणि आधार कार्ड लिंक कसे करायचे याची सोपी पध्दत जाणून घ्या. याकरिता सर्वप्रथम आयकर विभागाच्या वेबसाईटवर जा. आधार कार्डवरील नाव, पॅन क्रमांक आणि आधार क्रमांक भरा. आधार कार्डवर केवळ जन्म तारीख नमूद केली असेल. तर स्क्वेअरवर टिक करा. त्यानंतर कॅप्चा कोड टाईप करा. त्यानंतर Link Aadhaar या बटणावर क्लिक करा. तुमचे पॅन कार्ड आधार कार्डाशी लिंक होईल. एसएमएसद्वारे पॅन कार्ड आधार कार्डाशी लिंक करण्याची पध्दत यासाठी तुम्हाला तुमच्या फोनवर UIDPAN त्यानंतर तुमचा 12 अंकी आधार क्रमांक आणि त्यानंतर 10 अंकी पॅन क्रमांक टाईप करावा लागेल. आणि हा मेसेज तुम्हाला 567678 किंवा 56161 या क्रमांकावर पाठवावा लागणार आहे.