HDFC बँकेत शिफ्ट होणार मुंबई पोलिस दलातील 50 हजार कर्मचार्‍यांचं सॅलरी अकाऊंट, जाणून घ्या कारण

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – मुंबई पोलिसात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार आता अ‍ॅक्सिस बँकेच्या खात्यात होणार नाही. या सर्व कर्मचार्‍यांचे पगार खाते खासगी क्षेत्रातील दुसर्‍या बँकेत अर्थात एचडीएफसी बँकेत शिफ्ट केले जात आहे. मुंबई पोलिस अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. यासंदर्भात शासकीय परिपत्रकही जारी करण्यात आले आहे. मुंबई पोलिस हे देशातील सर्वात मोठे पोलिस दल आहे. सुमारे 50 हजार कर्मचारी यात काम करतात.

अशा परिस्थितीत आता या सर्व कर्मचार्‍यांचे पगार खाते एचडीएफसी बँकेत ट्रान्सफर केले जाईल. वास्तविक, मुंबई पोलिस आणि अ‍ॅक्सिस बँक यांच्यातील सर्व कर्मचार्‍यांच्या पगाराच्या खात्यासाठी सामंजस्य करारा (एमओयू) ची मुदत 31 जुलै 2020 रोजी संपली आहे.

मुंबई पोलिसांनी एचडीएफसी बँकेचीच निवड का केली?
तेव्हापासूनच, मुंबई पोलिस दुसऱ्या बँकेचा शोध घेत होते, ज्या आपल्या कर्मचार्‍यांना अ‍ॅक्सिस बँकेपेक्षा अधिक सुविधा देऊ शकेल. परिपत्रकात सांगण्यात आले की, अनेक बँकांनी यासाठी प्रस्ताव पाठविले होते, त्यापैकी मुंबई पोलिसांनी एचडीएफसी बँक निवडली. यासाठी एचडीएफसी बँक आणि मुंबई पोलिस यांच्यात नवीन सामंजस्य करार झाला.

मुंबई पोलिस कर्मचार्‍यांना हे फायदे मिळतील
परिपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिस कर्मचाऱ्याचा जर नैसर्गिक किंवा कोविड -19 मुळे मृत्यू झाल्यास दहा लाख रुपयांपर्यंतचे जीवन विमा संरक्षण देण्यात येईल. याशिवाय मुंबई पोलिसात काम करणाऱ्या कर्मचार्‍यांना 90 लाख रुपयांचे अ‍ॅक्सिडेंटल डेथ कव्हर मिळेल. अर्ध अपंगत्व आल्यास 50 लाख रुपयांचे संरक्षण दिले जाईल.