‘या’ बहाद्दराने चक्क २ वर्षे DySp बनून पोलिसांनाच गंडवलं ; आदेश दिले, सॅल्युट घेतले

रुपनगर (पंजाब) : वृत्तसंस्था – एका तोतया पोलीस उपअधीक्षकाने पंजाब पोलिसांना एक नाहीत तर दोन वर्षे गंडवल्याची घटना समोर आली आहे. पोलीस उपअधीक्षक बनून या व्यक्तीने अधिकाऱ्यांना आदेश दिले, सॅल्यूट घेत होता. एवढ्यावर तो थांबला नाही तर या बहादराने एका महिला पोलीस उपनिरीक्षकाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्याशी लग्न देखील केले. लग्नानंतर पत्निला संशय आल्याने या पोलीस उपअधीक्षकाचे बिंग फुटले आणि त्याला जेलची हवा खावी लागली.

विक्रमजीत सिंह असे या तोतया पोलीस उपअधीक्षकाचे नाव आहे. त्याने पंजाब पोलीस दलात येण्यासाठी आपले नाव विक्रमजीत असे सांगितले होते. तपासादरम्यान त्याचे खरे नाव मोहित अरोरा असल्याचे स्पष्ट झाले. विक्रमजीत उर्फ मोहित हा पंजाबच्या जालंधर भागात राहतो. त्याच्यावर रुपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला रूपनगर जेलमध्ये ठेवण्यात आले आहे.

सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे हा नकली उपअधीक्षक खराखुरा बंदुकधारी पोलीस घेऊन विविध तपासणी नाके आणि पोलीस ठाण्यात फिरत होता. या काळात त्याला एका तपासणी नाक्यावर तैनात असलेली महिला पोलीस उपनिरीक्षक आवडली. तिला मागणी घालताना त्याने तिला आपण पोलीस उपअधीक्षक असल्याचे सांगितले होते. या दोघांनी गेल्या वर्षी जुलैमध्ये लग्न केले.

लग्नानंतर त्याच्या उपनिरिक्षक पत्नीला संशय आला. मोहित अरोरा याने तिला सांगितले की त्याला निलंबित करण्यात आले आहे. यावर तिने पोलिस अधिकाऱ्यांना विनंती करून निलंबन रद्द करण्याचे सांगितले. त्याच्या निलंबनाची खबर पोलिस दलात पसरली आणि खरा प्रकार उघड झाला.