‘मी गोळीबार करायला लावल्याचं पसरवून त्यांनी निवडणूका लढवल्या’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –  मावळमधील पवना जलवाहिनी प्रकल्पावरून आतापर्यंत मोठ्या प्रमाणात राजकारण करण्यात आले आहे. या प्रकरणात अजित पवारांनी गोळीबार करायला लावला असे पसरवून याच मुद्द्यावर निवडणुका लढवल्या. परंतु आता राजकारण न आणता काही करायचे असेल तरच पुढे जाईल असे स्पष्ट सांगत पवार यांनी सर्व पक्षीय आमदारांना पाईप लाईनच्या कामाची स्थगिती उठवण्यासंदर्भात लेखी मागणी देण्यास सांगितले.

या जलवाहिनीचे काम मागील अनेक वर्षांपासून बंद आहे. यासंदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयात पवना बंद पाईप लाईन व लोकांच्या पुनर्वसन विषया संदर्भात उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला मावळचे आमदार सुनील शेळके व इतर पक्षाचे लोकप्रतिनिधी उपस्थित होते. पवना बंद पाईप लाईनच्या कामाची स्थगिती उठवण्यासाठी सर्व संबंधित आमदारांनी लेखी मागणी करा. यासाठी पवार यांनी बैठकीत स्वत : फोन करून आमदार आण्णा बनसोडे,लक्ष्मण जगताप आणि विलास लांडगे यांना पत्र देण्यास सांगितले.

त्याचबरोबर या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या लोकांना प्रत्येकी किमान दोन एकर जमीन देणे, धरणाच्या मजबुतीकरण व उंची वाढविण्याचे काम हाती घेणे, उंची वाढल्यानंतर साठणारे अतिरिक्त पाणी साठा एक टीएमसी पिंपरी-चिंचवड महापालिकेला व अर्धा टीएमसी पाणी संबंधित गावांना देण्यासंदर्भात देखील बैठकीत चर्चा करण्यात आली. दरम्यान, पवार यांनी य बैठकीत गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी आवश्यक प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सुचना दिल्या. तसेच यामध्ये गावांच्या पाणी योजनेसाठी येणारा पन्नास टक्के खर्च राज्य शासनाकडून उपलब्ध करून देण्याची तयारी देखील पवार यांनी दाखवली. त्यामुळे लवकरच हा प्रश्न देखिल मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.