‘तो’ तोतया वकील पोलिस कोठडीत !

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – तोतया वकील मंगलेश भालचंद्र बापट यास वैद्यकीय उपचारानंतर आज सायंकाळी कर्जत येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 6 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेने जिल्हा न्यायालयातून ताब्यात घेतलेल्या बापट याची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी डिस्चार्ज दिल्यानंतर आज सहाय्यक पोलिस निरीक्षक माने यांनी आज (दि. २८) संध्याकाळी अटक केली. आरोपी बापट यास बनावट व खोटी कागदपत्रे तयार करून सनद मिळवली व त्याद्वारे विविध कोर्टात दिशाभूल करून अनेक लोकांची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात अटक केली आहे. बापट यास कर्जत न्यायालयात हजर केले, असता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पळसापुरे यांनी त्यास 6 मार्चपर्यंत दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

तोतया वकील मंगलेश बापट हा अनेक दिवसांपासून विविध न्यायालयांमध्ये वकील म्हणून वावरत होता. त्याने अनेक लोकांची फसवणूक केली आहे. तसेच विविध कोर्टाची दिशाभूल केलेले आहे. त्याच्यावर विविध कोर्टामध्ये अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. तोतया वकील मंगलेश बापट याच्याविरुद्ध युवराज नवसरे यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात तक्रार अर्ज केला होता. जिल्हा न्यायालयाने दखल घेत तोतया वकील बापट याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नवसरे यांनी कर्जत पोलिस स्टेशन येथे येथे दिनांक 25 फेब्रुवारी रोजी फिर्याद दाखल केली होती.

बापट हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याने अशा प्रकारचा गुन्हा करताना कोणाची मदत घेतली? खोटी कागदपत्रे तयार करण्यासाठी तो कोण-कोणत्या ठिकाणी गेला, याचा तपास करण्यासाठी पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ती मान्य करत तोतया वकील आरोपी मंगलेश भालचंद्र बापट यास 6 मार्चपर्यंत दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.