पडीक जमिनीला “कृषी पर्यटन स्थळ बनवणारा अवलिया”

कुंभारगाव : प्रेरणा परब -खोत

“प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे ” अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. याच उक्तीला साजेल असे काम कुंभारगाव येथील एका शेतकऱ्याने  केले आहे. वडिलोपार्जित ७ एकर जमिनीला त्यांनी आता कृषी पर्यटनाचे स्थळ बनवले आहे. कुंडलिक धुमाळ असे या अवलियाचे नाव आहे.

पुण्यापासून १०० किलोमीटर आतंरावर असलेल्या पुणे -सोलापूर हायवेलागत ,भिगवण गावापासून १० किलोमीटर अंतरावर कुंभारगाव हे गाव आहे. खरंतर धुमाळ यांची ७ एकर वडिलोपार्जित जमीन होती . पण ही जमीन अशी होती की ज्यात शेतीचे पुरेसे उत्पन्न येऊ शकता नव्हते . सुरवातीला त्यांनी या जमिनीत शेती करायला सुरुवात केली.पण म्हणावे तसे उत्पन्न या शेतीतून येत नव्हते. म्हणून मग त्यांनी उत्पन्नासाठी दुकान टाकायचे ठरवले . पण ते देखील फारसे चालेना . त्यानंतर मग शासनाकडून चालवल्या जाणाऱ्या मिटकॉन कडून कृषी पर्यटनाचे प्रशिक्षण घेतले.  त्यानंतर आपल्या पडीक जमिनीला त्यांनी कृषी पर्यटनाचे स्थळ बनवण्याचे ठरवले.

उजनी चे पाणी ठरले वरदान…
सोलापूर जिल्ह्यातील उजनी  धरणाचे जलाशय हे तेथील आसपासच्या गावांकरिता वरदान ठरले आहे . कुंभारगाव देखील अशाच गावांपैकी एक आहे. उजनी जलाशयाच्या पाण्याची त्यांनी पाईपलाईन करुण घेतली . उजनीची दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे उजनीच्या जलाशयात हिवाळ्याच्या दिवसात अनेक स्थलांतरीत पक्षी येतात . हीच बाब कृषी पर्यटनासाठी देखील महत्वाची ठरू शकते हे धुमाळ यांना उमगलं. म्हणूनच त्यांनी पारंपारिक  शेती सोबतच पर्यटकांना त्यांच्या कृषी पर्यटन स्थळ ‘उजनी पार्क ‘ येथे उजनीच्या जलाशयात येणारे परदेशी पक्षी देखील दाखवण्याचे ठरवले.

उजनीच्या या जलाशयात ,ग्रेटर फ्लेमिंगो (अग्निपंख ),चमचचोच्या ,कुदळ्या (ब्लॅकहेडेड आयबीस ), पाणटिवळा, रंगीत करकोचा ,जांभळी पाणकोंबडी , हळदीकुंकू बदक ,कंठेरी चिखल्या ,सोनेरी चिखल्या ,ब्राम्हिण्य शेल्ड्क ,ब्लॅक विंग स्टील्ट ,रेड वाटल्ड लॅपविंग ,लिटातले ग्रेब असे  देश विदेशातील जवळपास २००-२५०पक्षी पाहायला मिळतात.

धुमाळ यांच्या उजनी पार्क मध्ये  या पक्षांसोबतच चुलीवरचे जेवण , आकाश निरीक्षण ,तंबूमध्ये राहणे ,शेकोटी ,बैलगाडीची सफर ,ट्रॅक्टर ची सफर अशा गोष्टी  देखील आहेत . तसेच आंबा ,चिकू ,सीताफळ,रामफळ ,पेरू ,नारळ ,जांभूळ ,आवळा ,अंजीर ,लिंबोणी या झाडांसहीत भाजीपाला आणि फळभाज्या याची देखील लागवड केली आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक माणसाला या झाडांची ओळख करून दिली जाते . इथे पर्यटक म्हणून आलेल्या व्यक्तींना त्यांच्या शेतातील अस्सल सेंद्रीय पद्धतीने पिकवलेल्या भाज्या दिल्या जातात . उदाहरण द्यायचे झालेच तर येथे गरम गरम बाजरीच्या भाकरी पिठल्यासोबत शेतातलाच कांदा दिला जातो आणि फळ, तसेच लिंबू हेसुद्धा शेतातलेच असतात.

कृषी पर्यटनातून रोजगार निर्मिती
धुमाळ यांनी कृषी पर्यटनातून फक्त स्वतःसाठी विचार केला नाही तर गावातील लोकांना देखील याद्वारे रोजगार मिळाला आहे. पक्षी निरीक्षणामुळे गावातील काही तरुण बोटिंग आणि गाईड म्हणून काम करतात. तसेच या गावातील महिलांना देखील रोजगार मिळाला आहे.

विशेष म्हणजे सुरुवातीला या ठिकाणी झाडे उगवत नसत. त्यामुळे झाडे जागवणे हे मोठे आव्हान होते. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात परराज्यातून तोडणी कामगार यायचे. या कामगारांना त्यांनी आपल्या या जमिनीवर राहण्यासाठी परवानगी दिली आणि त्याच्याबदल्यात त्यांना ‘तुम्ही एक झाड जगवायचे ‘ असे सांगितले त्यांची ही योजना कमालीची ठरली आणि त्याठीकाकानी येणाऱ्या तोडणी कामगाराने देखील झाड जागवली.

बदलत्या हवामानामुळे सध्या शेती व्यवसाय धोक्यात आहे . पण आपल्या  शेतीला कृषी पर्यटन स्थळ म्हणून विकसित केले तर त्यातून उत्पन्न देखील मिळेल  जास्तीत जास्त तरुणांनी फक्त शेती न करता या पर्यायाचा विचार करावा असे धुमाळ आवर्जून सांगतात. या कामात त्यांना त्यांच्या पत्नी वैशाली धुमाळ आणि त्यांचे कुटुंब मदत करते.