मैत्रिणीच्या नावानं फेक Facebook अकाऊंट काढून त्यानं केला भलताच उद्योग, तरूणानं धक्कादायक कृत्य केल्यानंतर FIR
विरार : पोलीसनामा ऑनलाइन – एका व्यक्तीने फेसबुकवर आपल्या मैत्रिणीच्या नावे बनावट खाते काढून तिची बदनामी केली आहे. नालासोपारा येथे ही संतापजनक घटना घडली आहे. आरोपीने मैत्रिणीचे फोटो फेसबुकवर पोस्ट करत अश्लील मजकुर देखील प्रसारीत केला होता. त्यामुळे पीडितेला भलतेच फोन येऊ लागले. संबंधित प्रकरण तिच्या लक्षात येताच तिने या प्रकरणी संबधित व्यक्तीवर नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
नालासोपारा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित 43 वर्षीय महिला नालासोपाऱ्यातील पश्चिम परिसरात राहते. पीडितेच्या मित्राने तिच्या नावाने फेसबुकवर एक फेक अकाऊंट काढून तिचे फोटो प्रसारीत केले होते. तसेच वेश्याव्यवसाय करत असल्याची माहिती पोस्ट करून तिचा मोबाईल नंबरही शेअर केला होता. यानंतर पीडितेला अनेकांचे भलत्याच कामासाठी फोन येऊ लागले. मात्र त्यानंतर हे प्रकरण तिच्या लक्षात येताच तिने थेट नालासोपारा पोलीसात आपल्या मित्राविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सध्या आरोपीचा शोध घेत आहेत.