मराठवाड्याचा दुष्काळ या पुढची पिढी पाहणार नाही : मुख्यमंत्री

औरंगाबाद : पोलिसनामा ऑनलाईन – सध्या संबंध महाराष्ट्रात दुष्काळ असून इतर भागाच्या तुलनेत मराठवाड्यात दुष्काळाच्या झळा जरा जास्तच असतात. परंतु आता इथून पुढच्या पिढीला मराठवाड्यातील दुष्काळ पाहू देणार नाही, हा आमचा संकल्प आहे आणि त्यासाठी जे करावं लागेल ते आम्ही करु. त्यामुळे मराठवाड्याचा दुष्काळ हा भूतकाळ असेल, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प व्यक्त केला.  औरंगाबाद मधील दुष्काळाची पाहणीनंतर एका आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले कि, आमच्या सरकारच्या काळात झालेली जलयुक्त शिवारची कामं झाली नसती तर आत्तापेक्षा भीषण दुष्काळाचा सामना करावा लागला असता. जलयुक्तमुळे पाणी अडवले जाते आणि त्यामुळे विहिरींना पाणी जास्त काळ राहिल्यामुळे ग्रामीण भागात टँकर वीना बराच काळ पाणी पुरु शकलं. कमी पाऊस असूनही शेतीची उत्पादकता वाढली. हे जलयुक्त शिवार योजनेमुळे शक्य होऊ शकले.

आगामी काळात दुष्काळा पासून कायम ची सुटका मिळावी म्हणून केंद्र सरकारने दुष्काळ निवारणासाठी राज्याला ४ हजार कोटींची मदत केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी ११ प्रमुख धरणांची एक ग्रीड आम्ही तयार करतोय. त्यांना पाईपने जोडण्याची योजना आहे. पाईपच्या माध्यमातूनच पिण्याचे आणि सिंचनाचे पाणी पोहचवणारे असल्याचेही ते बोलले. त्यामुळे मराठवाड्याचा दुष्काळ हा भूतकाळ असेल, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी आपली दुष्काळ मुक्तीची भुमिका स्पष्ट केली.