Coronavirus : सोलापूरात ‘कोरोना’मुळे पोलीस कर्मचाऱ्याचा पहिला बळी

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनामुळे एमआयडीसी पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदाराचा मृत्यू झाला आहे. मृत सहाय्यक फौजदार वालचंद कॉलेज जवळील एकता नगरमध्ये वास्तव्यास होते. कोरोनाचा जिल्ह्यातील दहावा बळी आहे. सहाय्यक फौजदाराला 29 एप्रिल रोजी पोलीस ठाण्यात असताना ताप आणि कणकण आली होती.

सोलापूरात बुधवारी कोरोनाची बाधा झालेले आठ नवे रुग्ण आढळून आले. त्यातील एका पोलिसाचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधित झालेल्यापैकी तीन पोलिसांचा समावेश आहे. आतापर्य़ंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 153 तर मृतांची संख्या 10 वर गेली आहे. आज बुधवारी आढळून आलेले सर्व रुग्ण पुरुष असून बहुसंख्य दाट लोकवस्त्यांसह झोपडपट्टी परिसरात राहणारे आहेत.

कोरोनाने बळी घेतलेल्या पोलीस हवालदाराचे वय 57 वर्षाचे होते. येत्या काही महिन्यात ते सेवानिवृत्त होणार होते. शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात सध्या ते नेमणुकीस होते. त्यांना काही दिवसांपूर्वी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले होते. कोरोनाची लक्षणं दिसू लागल्यामुळे त्यांची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली होती. मात्र, चाचणी अहवाल प्राप्त होण्यापूर्वीच काल रात्री त्यांचा मृत्यू झाला.

आज दुसऱ्या दिवशी अहवाल प्राप्त झाला असून त्यात मृत हवालदाराला कोरोनाची बाधा झाली होती, हे स्पष्ट झाले. यापूर्वी, सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील तीन पोलिसांना कोरोनाबाधा झाली आहे. मृत पोलीस हवालदाराच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेण्यात येत आहे.