दोन्ही पाय निकामी असलेल्या बगळ्याला दिले जीवनदान

लासलगाव – पोलिस कार्यालयाच्या आवारात पडलेल्या गंभीर जखमी व दोन्ही पाय निकामी असलेल्या बगळ्याचे प्राण वाचविण्यात पोलीस कर्मचारी व पशुवैद्यकीय अधिकारी यांना यश आले आहे.

मंगळवारी दुपारच्या सुमारास पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप आजगे यांना पोलिस कार्यालयाच्या आवारात गंभीर अवस्थेत बगळा पडलेला दिसल्यानंतर त्यांनी त्यास उचललत पाहणी केली असता दोन्ही पाय निकामी झाले असल्याचे निदर्शनास आले.

पशुवैद्यकीय अधिकारी डॉ दत्ता मोटेगावकर यांनी या गंभीर बगळ्यावर यशस्वी उपचार केले. दोनही तुटलेल्या पायांचे प्लास्टर करत या बगळ्याला पक्षीमित्रांचा ताब्यात देण्यात आले.

शहरातील पक्षीमित्र बाबा गीते हे पुढील काही दिवस या बगळ्याचा सांभाळ करणार असून तब्येत ठीक झाल्यानंतर त्याला मुक्त वातावरणात सोडून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.