माशाचं कालवण केलं नाही म्हणून बायकोचा खून ! तिचं वेगळंच म्हणणं होतं

राहुरी : पोलीसनामा ऑनलाईन –   एका ऊसतोड मजुरानं माशाचं कालवण केलं नाही म्हणून पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तालुक्यातील कुक्कडवेढे येथे सोमवारी रात्री हा प्रकार घडला. गंगाबाई बद्री चव्हाण (41) असं मृत पत्नीचं नाव आहे.

बद्री फुला चव्हाण (वय 46, रा. कळनकी, ता- कन्नड, जि औरंगाबाद) असं आरोपीचं नाव आहे. राहुरी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्यानं गुन्हा कबूल केला आहे. राहुरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवला आहे.

नेमकं काय घडलं ?

बद्री यानं सोमवारी रात्री मासे आणले आणि पत्नीला भाजी करण्यास सांगितलं. मात्र सोमवार असल्यानं पत्नीनं माशाची भाजी करायला नकार दिला. यावरून दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. संतापलेल्या बद्रीनं पत्नी गंगाबाईला ओढत कोपीच्या बाहेर नेलं. लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत डोक्यात दगड घालून तिचा खून केला.

आज सकाळी कुक्कडवेढे येथे त्यांच्या कोपीजवळ मुळा धरणाच्या उजव्या कालव्याच्या बाजूला पाण्याच्या डबक्याजवळ अर्धनग्न अवस्थेत गंगाबाईचा मृतदेह आढळून आला. अपर पोलीस अधीक्षक डॉ दीपाली काळे, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, परिविक्षाधीन सहायक पोलीस अधीक्षक आयुष नेपानी, राहुरी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक सचिन बागुल यांनी पथकासह घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला.

बद्री आणि गंगाबाई यांचा मुलगा पृथ्वीराज बद्री चव्हाण (वय 18) याच्या फिर्यादीवरून आईचा खून केल्या प्रकरणी आरोपी वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.