‘माझ्यावर अत्याचार करणारा मेहबूब शेख राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा प्रदेशाध्यक्षच’

पोलीसनामा ऑनलाईन टीम : राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख(रा. शिरूर, जि. बीड) यांच्याविरुद्ध २९ वर्षीय शिक्षिका तरुणीने दिलेल्या तक्रारीवरुन सिडको पोलीस ठाण्यात २६ डिसेंबर रोजी बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल झाला. मुंबईत शिक्षक पदावर नोकरी लावण्याच्या आमिषाने जवळीक साधून कारमध्ये १४ नोव्हेंबर रोजी रात्री हा अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद केले होते. आरोपी हा सत्ताधारी राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्यामुळे अशा गंभीर स्वरुपाच्या गुह्यातील आरोपीप्रमाणे तातडीने अटक न करता गुह्याचा तपास सुरू केला. दरम्यान, “आपल्यावर अत्याचार करणारा महेबूब शेख दुसरा तिसरा कोणी नसून राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचा प्रदेश अध्यक्षच आहे. आरोपी महेबूब शेख हा तो मी नव्हेच असे खोटे बोलत आहे,” असं पिडितेने आज एका व्हिडीओमधून स्पष्ट केले. दरम्यान, पोलीस मेहबूब शेख यांना जबाबासाठी बोलवणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

दरम्यान, आरोपी महेबूब शेख यांनी मुंबई पक्ष कार्यालयांत पत्रकार परिषद घेऊन खुलासा करतांना त्यांच्याविरूध्द खोटी तक्रार नोंदविण्यात आली. आपल्याविरुद्ध तक्रार करणाऱ्या महिलेला ओळखत नाही, कधी भेटलो नसल्याचा दावा शेख यांनी केला होता. दरम्यान, या प्रकरणातील पिडीता हिने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत दिलेला राहण्याचा पत्ता आणि आधारकार्डवरील पत्ता यात तफावत असल्याचे समोर आले. भाजपा महिला मोर्चाने गत सप्ताहात याप्रकरणातील आरोपी महेबूब शेख याला अटक करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले. शिवाय प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी या घटनेत पोलीस आरोपीला वाचविण्यासाठी धडपड करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. या गुंह्याचा तपास पोलीस उपायुक्त दिपक गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त निशिकांत भुजबळ करीत आहेत. त्यांच्या मदतीसाठी फौजदार दर्जाच्या अधिकाऱ्यांची तीन पथके या गुंह्याचा तपास करीत आहेत. गुंह्याचे स्वरूप आणि आरोपी राजकीय पक्षाचा प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे या घटनेचे गांभीर्य वाढले आहे.

बलात्काराचा आरोप असलेले राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी याविषयी पत्रकार परिषद घेऊन तक्रारीत नमूद तारखेला ते औरंगाबाद शहरात नव्हते असे सांगून आपल्याविरुध्द तक्रार देणाऱ्या महिलेला ओळखत नसल्याचे म्हटले. असे असले तरी महेबूब शेख यांचा जबाब पोलिसांकडून नोंदविण्यात येणार आहे. या करीता लवकरच पोलिसांकडून महेबूब शेख यास हजर राहण्यासंदर्भात नोटीस बजावली जाऊ शकते. मात्र कधी त्यांना बोलावणार याविषयी मात्र अधिक माहिती देण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला.

व्हिडिओ केला जारी
या पार्श्वभूमीवर पिडीतेने आज एक व्हिडिओ जारी केला. यात तिच्यावर अत्याचार करणारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख हाच असल्याचे स्पष्ट केले. शिवाय मेहबूब शेख खोटे बोलत असल्याचा दावा तिने केला आहे. मी उच्च शिक्षित आहे. यापुढे आपल्याला जे काय बोलायचे ते न्यायालयासमोर बोलेन . पोलिसांना काही सांगणार नाही असेही तिने व्हिडिओ मधून स्पष्ट केले.