वनरक्षकासाठी ‘तो’ करीत होता ‘दलाली’, वन विभागाने केले त्याला पोलिसांच्या हवाली !

भद्रावती : पोलीसनामा ऑनलाइन – जागतिक ख्याती प्राप्त झालेल्या भद्रावती तालुक्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट देण्यासाठी संपूर्ण जगातून पर्यटक ताडोबाला येत असतात. येथील काही वन कर्मचारी दलालांमार्फत पैसे घेऊन अवैधरित्या ताडोबात पर्यटकांना प्रवेश देत असल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, ताडोबा अभयारण्यात जाण्याकरिता पर्यटकांसाठी वेगवेगळे प्रवेशद्वार आहेत. या प्रवेशद्वारातून विनापरवानगी कोणालाही आत जाता येत नाही. असे असतानादेखील चिमूर तालुक्यातील खडसंगी गावाजवळील नवेगाव प्रवेशद्वारातून टेकचंद सोनुले नामक वनरक्षक खडसंगी येथील सचिन कोयचाडे या दलालामार्फत पैसे घेऊन पर्यटकांना अवैधरित्या सदर प्रवेशद्वारातून ताडोबात प्रवेश देतो, अशी माहिती ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक डाॅ. जितेंद्र रामगावकर यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी दि. १ डिसेंबर रोजी नवेगाव प्रवेशद्वारावर जाऊन चौकशी करण्याचे आदेश वन कर्मचा-यांना दिले. वन कर्मचा-यांनी सदर ठिकाणी जाऊन चौकशी केली असता, सचिन कोयचाडे हा सदर प्रवेशद्वारातून जिप्सी सोडण्यासाठी पर्यटकांकडून ९ हजार रुपये आपल्या खात्यात जमा करायला सांगत असल्याचे उघडकीस आले. तसेच आम्ही संगनमत करून जिप्सी सोडत होतो व असा प्रकार यापूर्वीही केलेला आहे, अशी कबुली सोनुले व कोयचाडे यांनी दिली.

दरम्यान, या दोघांविरुद्ध चिमूर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई क्षेत्रसंचालक डाॅ. रामगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक महेश खोरे, ताडोबा वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) सतीश शेंडे व इतर वन कर्मचा-यांनी पार पाडली.

ताडोबा-अंधारी व्यवस्थापनाचे पर्यटकांना आवाहन
दरम्यान, या पर्यटन प्रकल्पातील आरक्षण करून देण्याकरिता कोणत्याही एजंटची नियुक्ती केलेली नसून आरक्षण मिळवून देण्याच्या कोणत्याही भूलथापांना पर्यटकांनी बळी पडू नये. या व्याघ्र प्रकल्पात प्रवेश करण्यासाठी प्रकल्पाच्या www.mytadoba.org या अधिकृत संकेत स्थळावरूनच परवाना आरक्षित करावा, असे आवाहन ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनातर्फे पर्यटकांना करण्यात आले आहे.