Ind vs Aus : ‘रोहित शर्मा’सहित 5 भारतीय खेळाडूंनी तोडला ‘प्रोटोकॉल’, संघापासून करण्यात आलं वेगळं : रिपोर्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  –   भारतीय क्रिकेट संघाचे उपकर्णधार रोहित शर्मा यांच्यासह 5 खेळाडूंनी ऑस्ट्रेलियामधील बायो सिक्युरिटी प्रोटोकॉलचे उल्लंघन केले आहे. पृथ्वी शॉ, ऋषभ पंत, शुभमन गिल आणि नवदीप सैनी यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये ते हॉटेलमध्ये काहीतरी खाताना दिसत आहेत. भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर असून त्यांना टीम बायो बबल सोडण्याची परवानगी नाही. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ या व्हिडिओची तपासणी करत आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या म्हणण्यानुसार पाचही खेळाडूंना टीमपासून वेगळे आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.

पाच भारतीय खेळाडूंचा मेलबर्नच्या बीबीक्यू रेस्टॉरंटमध्ये बसून जेवतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. रेस्टॉरंटच्या स्टाफने याबाबतची पुष्टी ऑस्ट्रेलियन वृत्तपत्र सिडनी मॉर्निंग हॅरार्ड आणि द एज यांना दिली की रेस्टॉरंटला खेळाडूंनी भेट दिली होती. एका भारतीय चाहत्याने नवीन वर्षाबद्दल रोहित शर्मा आणि त्यांच्या साथीदारांचे बिल भरले आहे तसेच सोशल मीडियावरही हे शेअर केले आहे.

नवलदीप सिंहने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये भारतीय खेळाडू त्यांच्या समोर टेबलवर भोजन करीत बसले आहेत. त्यांनी लिहिले की, भारतीय खेळाडू माझ्यासमोर बसले आहेत यावर माझा विश्वास बसतच नाही. त्यांना माहित नाही की मी त्यांच्या जेवणाचे बिल भरले आहे. त्यांनी पुढे सांगितले की रोहित आणि ऋषभ पंत यांनी जेवणाचे पैसे घेण्याची विनंती केली.

रोहित शर्मा म्हणाले, तुम्हाला पैसे घ्यावे लागतील कारण ते योग्य दिसत नाही. ऋषभ पंत म्हणाले की तुम्ही आमच्याकडून पैसे घेतले नाही तर आम्ही तुमच्याबरोबर फोटो काढणार नाही. नवलदीपने पैसे घेण्यास स्पष्ट नकार दिला आणि ते म्हणाले की आम्ही तुमचे चाहते आहोत आणि आमच्या स्टार खेळाडूंसाठी इतके तर करूच शकतो. नंतर निघताना पंतने नवदीप सिंह यांच्या पत्नीचे आभार मानले आणि फोटो देखील काढला.