चिनी कंपनी Vivo नसणार IPL 2020 ची प्रायोजक ! विरोधानंतर मोडला जाऊ शकतो करार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चिनी मोबाइल कंपनी विवो बीसीसीआयबरोबरचा करार मोडू शकते. विवो आयपीएलची प्रायोजक आहे आणि अद्याप त्यांचा तीन वर्षांचा करार बाकी आहे. वास्तविक विवोचा इंडियन प्रीमियर लीगच्या सहकार्याबाबत सर्वत्र विरोध केला जात आहे. अनेक भारतीय चाहत्यांपासून ते अनेक मोठ्या लोकांनी व बऱ्याच संस्थांनीही त्याविरोधात आवाज उठवला आहे. सतत आवाज उठवल्यामुळे आणि त्यांच्याविरोधात निषेधामुळे विवोनेही मंडळाबरोबरचा त्यांचा करार मोडण्याचा निर्णय घेतला आहे आणि लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल. मात्र आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत विवो आयपीएलचा प्रायोजक म्हणून कायम राहण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सूत्रांच्या माहितीनुसार, विवो कदाचित या हंगामातून बाहेर होऊ शकते, पण असेही म्हटले जात आहे की २०२१ ते २०१३ दरम्यान ते पुन्हा एकदा या लीगचा भाग होतील.

वास्तविक, लडाख सीमेवर जून महिन्यात भारतीय सैन्य आणि चिनी सैन्य यांच्यात झालेल्या चकमकीनंतर दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये तणाव आहे. यानंतर देशभरात चिनी कंपन्यांविरोधात निषेधाचे वातावरण आहे आणि खुद्द भारत सरकारनेही अनेक चिनी कंपन्यांशी केलेला करार मोडला आहे. तसेच अनेक चिनी अ‍ॅप्सवरही बंदी घातली आहे. विवोही आयपीएलचा शीर्षक प्रायोजक आहे आणि त्या बदल्यात ते बोर्डला ४४० कोटी रुपये देतात. विवोचा आयपीएलबरोबर २०२२ पर्यंत पंचवार्षिक करार आहे. म्हणजेच त्यांचा अद्याप तीन वर्षांचा करार बाकी आहे.

जर या वेळी विवो आयपीएलमधून वेगळे झाले तर आयपीएल २०२० चे शीर्षक प्रायोजक कोण असेल याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. आयपीएलचा १३ वा सीझन युएईमध्ये १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. यावेळी सामन्यांच्या वेळेतही बदल करण्यात आले आहेत. ज्या दिवशी दोन सामने असतील त्या दिवशी पहिला सामना दुपारी ३.३० वाजता आणि दुसरा सामना संध्याकाळी ७.३० वाजता खेळला जाईल. त्याशिवाय सायंकाळी ७.३० पासून इतर सामने खेळले जातील.