दक्षिण आफ्रिका क्रिकेटमधून चिंताजनक बातमी, 7 जणांना ‘कोरोना’ची लागण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूची लागण झालेल्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या साथीच्या विरोधात जगभरातील अनेक देश लढा देत आहेत. अनेक देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले होते. पण आता लॉकडाऊनमधून सूट मिळाल्यानंतर कोरोना विषाणूमुळे संक्रमित होणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेटसाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे. क्रिकेट बोर्डासाठी काम करणाऱ्या 7 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक खेळांवर बंदी घालण्यात आली होती. यामध्ये क्रिकेट खेळण्यावर बंदी घालण्यात आली होती. दक्षिण आफ्रिका संघाने देखील अनेक दिवसा नंतर क्रिकेट सुरु करण्याची तयारी सुरु केली आहे. अशा परिस्थितीत क्रिकेट बोर्डाने खेळाडू आणि कर्मचारी असे एकूण 100 जणांची कोरोना टेस्ट केली होती. खेळाडूंच्या आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्यच्या दृष्टीने ही चाचणी करण्यात आली होती. कोरोनाची चाचणी घेण्यात आलेल्या पैकी 7 जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने बऱ्याच दिवसांपासून क्रिकेट मैदानाबाहेर बसून असलेल्या सर्व खेळाडू आणि प्रेक्षकांना दिलासा देत सोलिडैरिटी कपचे आयोजन केल्याची घोषणा केली होती. ही स्पर्धा 27 जून रोजी सुरु होणार होती. मात्र, 7 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.