Ind vs SA : पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर, ‘या’ खेळाडूंचा पत्ता कट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेला बुधवारपासून सुरुवात होत आहे. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना विशाखापट्टणम येथे खेळवण्यात येणार आहे. पहिल्या लढतीमधून यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याला ‘अंतिम 11’मधून बाहेर ठेवण्यात आले असून त्याच्या जागी ऋद्धिमान साहा याची निवड करण्यात आली आहे. तसेच सलामीवीर रोहित शर्मा आणि फिरकी गोलंदाज आर. अश्विन हे दोघे कसोटीमध्ये पुनरागमन करणार आहेत. सामन्यापूर्वी मंगळवारी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने पत्रकार परिषदेत याविषयी माहिती दिली आहे.

बीसीसीआयने पहिल्या कसोटीसाठी अंतिम अकरा जणांची नावं मंगळवारी जाहीर केली. ऋषभ पंतच्या जागी अनुभवी विकेटकीपर ऋद्धिमान साहा याला संधी देण्यात आली आहे. तब्बल वर्षभराच्या काळानंतर साहा संघात पुनरागमन करत आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यावर टेस्ट मालिकेत पंतला चांगली कामगिरी करता आली नव्हती.

या सामन्यात रोहित शर्मा प्रथमच कसोटीत सलामीला येणार आहे. मयांक अग्रवालसोबत तो डावाची सुरुवात करेन. तसेच अंतिम 11 मध्ये आर. अश्विनचा समावेश करण्यात आला आहे. दोघेही 10 महिन्यानंतर कसोटीमध्ये पुनरागमन करणार आहेत.

पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ –

विराट कोहली ( कर्णधार), रिद्धिमान सहा (यष्टिरक्षक), अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, आर अश्विन, रवींद्र जडेजा, इशांत शर्मा, मोहम्मद शमी

Visit : Policenama.com