2011 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात ‘फिक्सिंग’च्या आरोपानंतर श्रीलंकेच्या सरकारनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय, जाणून घ्या

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   एकदिवसीय विश्वचषक 2011 मध्ये भारताने अंतिम सामन्यात श्रीलंकेला पराभूत केले आणि दुसर्‍यांदा विश्वचषक जिंकला, परंतु हा सामना फिक्स झाला होता असा आरोप श्रीलंकेचे माजी क्रीडामंत्री महिंदानंद अलुथगामेगे यांनी केला. आता माजी क्रीडामंत्र्यांच्या वतीने असे आरोप केल्यानंतर श्रीलंकेचे विद्यमान क्रीडामंत्री डल्लास अलाहाप्लेरुमा यांनी याबाबतच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या व्यतिरिक्त त्यांनी असे सांगितले आहे की या प्रकरणातील जे काही अपडेट असतील ते दर दोन आठवड्यांनी त्यांना देण्यात यावीत. यानंतर क्रीडा सचिव रूवानचंद्रा ने क्रीडा मंत्र्यांच्या आदेशानुसार मंत्रालयाच्या तपास युनिट समोर संबंधित तक्रार दाखल केली.

यापूर्वी महिंदानंद अलुथगामेगे यांनी आरोप केला होता की त्यांच्या टीमने हा सामना भारताला विकला होता. या आरोपानंतर माजी कर्णधार कुमार संगकारा आणि महेला जयवर्धने यांनी हे चुकीचे आहे असे सांगत पुरावा मागितला आहे. 2011 च्या वनडे वर्ल्ड कप फायनलमध्ये कुमार संगकारा श्रीलंका संघाचा कर्णधार होता. माजी क्रीडामंत्र्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की भारत आणि श्रीलंका यांच्यातील अंतिम सामना फिक्स झाला होता. ते म्हणाले की मी तुम्हाला सांगतो की आम्ही 2011 चा वर्ल्ड कप विकला होता. मी जेव्हा क्रीडामंत्री होतो तेव्हा असेच बोललो होतो आणि अजूनही मी या मुद्द्यावर उभा आहे.

महिंदानंद म्हणाले होते की आम्ही तो सामना जिंकला पाहिजे होता आणि मी संपूर्ण जबाबदारीने असे म्हणत आहे की मला तो सामना फिक्स झाल्याचे जाणवले. मी या विषयावर वादविवाद करण्यासही तयार आहे. या प्रकरणात संघाचे माजी कर्णधार कुमार संगकारा यांनी ट्वीट केले की, त्यांना आपले पुरावे आयसीसीच्या भ्रष्टाचार निवारण आणि सुरक्षा युनिटकडे नेण्याची गरज आहे, जेणेकरून या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होऊ शकेल.

दुसरीकडे, त्या अंतिम सामन्यात श्रीलंकेकडून शतकी खेळी करणारा माजी फलंदाज महेला जयवर्धने म्हणाला की, हे आरोप पूर्णपणे मूर्खपणाचे आणि निराधार आहेत. जयवर्धने यांनी ट्विट करत विचारले की, ‘निवडणुका होणार आहेत का? जी ही नवीन सर्कस सुरू झाली आहे. मला हे आवडले…नाव आणि पुरावा काय आहे.’ त्याचवेळी, माजी क्रीडामंत्र्यांनी सांगितले होते की, सामन्याच्या परिणामांना फिक्स करण्यासाठी खेळाडू नव्हे तर काही अन्य लोक गुंतले होते. यापूर्वी श्रीलंका क्रिकेट संघाचा माजी कर्णधार अर्जुन रणतुंगानेही 2011 च्या विश्वचषक फायनलच्या फिक्सिंगबद्दल बोलताना चौकशी करण्याची मागणी केली होती.