चेन्नईतील अपमानजनक पराभवामुळं क्रमवारीत खाली घसरला भारत, टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये झाला आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत आयसीसी कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारा दुसरा संघ निश्चित होणार आहे. इंग्लंडच्या संघाने शानदार कामगिरी करत भारताला 227 धावांनी पराभूत केले. या विजयासह इंग्लंड संघ कसोटी चँपियनशिप टेबलमध्ये टॉपवर गेला. या पराभवानंतर भारत चौथ्या क्रमांकावर घसरला. चेन्नई कसोटीच्या शेवटच्या दिवशी भारतीय संघ दुसर्‍या डावात फक्त 192 धावा करू शकला.

टेस्ट चॅम्पियनशिप टेबलमध्ये बदल

इंग्लंड विरुद्ध मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय संघ पहिल्या स्थानावर होता तर इंग्लंडचा संघ चौथ्या क्रमांकावर होता. आता हे चित्र पूर्णपणे पालटले. इंग्लंडने भारताचा पराभव केल्यामुळे कसोटी स्पर्धेत विजयाची टक्केवारी 70.1 आहे. न्यूझीलंडचा संघ 70 टक्के विजयांसह दुसर्‍या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा 69 टक्के विजयांसह तिसऱ्या, तर भारतीय संघ आता 68 टक्के विजयांसह चौथ्या स्थानावर घसरला आहे.

अंतिम सामन्यात पोहोचणारा न्यूझीलंडचा पहिला संघ

ऑस्ट्रेलियन संघाने दक्षिण आफ्रिकेचा दौरा पुढे ढकलल्यानंतर न्यूझीलंडच्या संघाचा फायदा झाला. न्यूझीलंड कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारा पहिला संघ ठरला. भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिका संपल्यानंतर अंतिम फेरी गाठण्याचा दुसरा संघ निश्चित होईल. अंतिम सामना 18 जून ते 22 जून दरम्यान इंग्लंडच्या लॉड्स येथे खेळला जाणार आहे.