उस्मानाबाद : 1000 रुपयाची लाच घेताना मुख्याध्यापक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन –   परिभाषिक अंशदान निवृत्ती योजना (DCPS) ही केंद्रीय राष्ट्रीय निवृत्ती योजनेमध्ये (NPS) वर्ग करण्यासाठी एक हजार रुपयाची लाच घेताना मुख्याध्यपकास उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. शाहूराज दत्तू भोजगुडे (वय-54 रा. समता नगर, उस्मानाबाद) असे लाच स्विकारताना रंगेहाथ पकडलेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे.

याप्रकरणी उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे एका शिक्षकाने तक्रार केली. तक्रारदार हे उस्मानाबाद जिल्ह्यातील चिखली येथील गांधी विद्यालयात कार्यरत आहेत. तर शाहूराज भोजगुडे हे या शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. तक्ररदार यांनी परिभाषिक अंशदान निवृत्ती योजना (DCPS) ही केंद्रीय राष्ट्रीय निवृत्ती योजनेमध्ये (NPS) वर्ग करण्यासाठी अर्ज केला होता. या कामासाठी भोजगुडे यांनी एक हजार रुपयाची लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

अधिकाऱ्यांनी लाचेची पडताळणी केली असता शाहूराज भोजगुडे यांनी तक्रारदार यांच्याकडे लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून लाच घेताना मुख्याध्यापक भोजगुडे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. भोजगुडे यांच्यावर बेंबळी पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग औरंगाबादचे पोलीस अधीक्षक डॉ.राहुल खाडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अनिता जमादार यांचे मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत संपते, पोलीस अंमलदार दिनकर उगलमूगले, अर्जुन मारकड, विष्णू बेळे, सिद्धेश्वर तावसकर, चालक दत्तात्रय करडे यांच्या पथकाने केली.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.