मुख्याध्यापकाकडून आश्रमशाळेतील मुलीचा विनयभंग, अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल

नरडाणा (धुळे) : पोलीसनामा ऑनलाईन – शिंदखेडा तालुक्यातील वर्षी येथील अभय कल्याण केंद्र संचलित शासकीय निवासी आदिवासी आश्रमशाळेतील सातवीत शिकणाऱ्या मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुलीचा विनयभंग शाळेच्या मुख्याध्यापकानेच केल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी नरडाणा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकाविरुद्ध विनयभंगासह अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वर्षी येथे अभय युवा कल्याण केंद्र संचलित शासकीय निवासी आदिवासी आश्रमशाळा असून त्या शाळेत इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे वर्ग आहेत. इयत्ता सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या एका आदिवासी विद्यार्थिनीचा शाळेच्या मुख्याध्यापकाने मागील तीन महिन्यापासून वेळोवेळी विनयभंग केला. तशी तक्रार या विद्यार्थिनीने पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. यामध्ये मुख्याध्यापकांनी तिच्या गळ्यात हात टाकणे, बेंचवर तिच्या हातावर हात ठेवून तिला लज्जा वाटेल असे कृत्य वेळोवेळी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या विद्यार्थिनीने त्याबाबत तिच्या पालकांना सांगितले. रविवारी मध्यरात्री विद्यार्थिनीचे पालक येथील पोलीस ठाण्यात आले आणि तक्रार दिली. त्यानुसार संबंधित मुख्याध्यापकाच्या विरुद्ध विनयभंग, अनुसूचित जाती जमाती कायदा व पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास विभागीय पोलीस अधीक्षक संदीप गावित यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू करीत आहेत.