दोडक्याचे ‘हे’ गुणकारी फायदे तुम्हाला माहितीयेत का ?

पोलीसनामा ऑनलाईन टीम : अनेकांना दोडका (luffa benefits )खायला आवडत नाही. परंतु काही लोक मात्र मोठ्या आवडीनं दोडक्याचं सेवन करतात. दोडक्याची भाजी किंवा चटणीही बनवली जाते. दोडक्यालाच शिराळे, कोशातकी अशा अनेक नावानं ओळखलं जातं. आयुर्वेदात याचा वापर उलटी, जुलाबाचं औषध म्हणून केला जातो. याच्या बियांचाही औषधी वापर केला जातो. दम खोकला, कफ आम्लपित्त, पोटदुखी, पोटफुगी या विकारात या बियांचं चूर्ण किंवा काढा उपयुक्त आहे. त्यामुळं प्रथम उलटी होते आणि नंतर जुलाबाद्वारे कफ बाहेर पडतो.

बाजारात जो गोड दोडका मिळतो त्यातही खूप औषधी गुणधर्म असतात. दोडका पथ्यकर भाजी आहे. जर मधुमेह किंवा लठ्ठपणा असेल तर दोडका दुधी भोपळ्याप्रमाणेच दोडका उकडून खावा. पाय दुखणं, मलावरोध, अग्निमांद्य, खडा होणं, पोट फुगणं, उष्णतेशी सतत काम असण्यामुळं येणारा थकवा, लघवी कमी होणं, थोडी थोडी लघवी होणं, तिडीक मारणं, या विकारात दोडक्याच्या फोडी, भाजी किंवा रस उपुयक्त आहे. अरूची, खोकला, कफ, कृमी व ताप या विकारात दोडका पथ्यकर पालेभाजी आहे. दुबळ्या व्यक्तींना वजन वाढवण्यासाठी दोडका खूप उपयुक्त आहे. दोडक्याच्या मुळांचा उपयोग मुतखडा पाडण्यासाठी होतो.

दोडका ही भाजी पचायला हलकी असते आणि पथ्याची समजली जाते. कारण यात फॅटचं प्रमाण खूप कमी असतं आणि कॅलरीज जवळपास नसतात. यकृताच्या आरोग्यासाठी आणि रक्तदाब आटोक्यात ठेवण्यासाठी दोडक्याचा खूप फायदा होतो. दोडक्याची साल किंवा त्याच्या शिरा फेकू नयेत.

जर त्या कोवळ्या असतील तर बारीक चिरून, शिजवून भाजी करावी किंवा परतून चटणी करावी. किंवा मग एका दोडक्याची साल घ्या, एक टोमॅटो घ्या आणि मिक्सरमधून काढून गाळून घ्या. आता याचं सार किंवा सूप तयार करा. आमांश, जुलाब, मंदाग्नी, पोटदुखी या विकारात रुग्णांनी दोडका टाळावा. तुम्ही असंही करू शकता, दोडक्याच्या शिरांची किसून तीळ घालून फोडणी देऊन त्याची चटणी करावी. यामुळं जेवण करताना 2 घास जास्त जातात.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे किंवा तुम्हाला सूट न होणारे पदार्थ वापरणं किंवा सेवन करणं टाळावं.