अनेक समस्यांवर रामबाण उपाय आहे दुधी भोपळा ! हृदयरोगांसाठी तर वरदानच आहे, जाणून घ्या 16 आश्चर्यकारक फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – आज आपण दुधी भोपळ्याचे 16 फायदे जाणून घेणार आहोत.

1) लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, ब जीवसत्व, प्रथिने, खनिजे, तंतुमय व पिष्टमय पदार्थ हे सर्व पोषक घटक दुधी भोपळ्यात आढळून येतात. आयुर्वेदानुसार दुधी भोपळा हा पित्तनाशक, कफनाशक, हृदय, सप्तधातूंचे पोषण करणारा आणि बलकारक आहे.

2) दुधी भोपळ्यात कमी उष्मांक असल्यानं तो हृदयरोगांसाठी एक वरदानच ठरला आहे. रोज सकाळी अर्धा कप दुधी भोपळ्याचा रस, तुळशीची 7-8 पानं, पुदीन्याची 7-8 पानं, जिरे, काळी मिरी एकत्र करून रोज सकाळी हा रस प्यावा. यामुळं रक्तवाहिन्यांमधील अडथळ दूर होतो आणि रक्तपुरवठा सुरळीत होतो.

3) दुधी भोपळा हा धातुपुष्टीकर असल्यानं गरोदर महिलेनं आहारात याचं सेवन नियमित करावं. यामुळं गरोदर महिलेचं आरोग्य चांगलं राहतं आणि गर्भाचं पोषणही व्यवस्थित होतं. गर्भावस्थेत वारंवार होणारा मलावष्टांभाचा त्रासही दूर होतो.

4) स्थूल व्यक्तींनी वजन कमी करण्यासाठी रोज संध्याकाळी जेवणापूर्वी दुधीचं सूप प्यावं. या सुपाला सैंधव, जिरे, हळद, मीठ व गाईच्या तुपाची फोडणी द्यावी. यामुळं पोट भरल्यासारखं वाटतं आणि शरीराला पोषक घटकही मिळतात.

5) जर शांत झोप येत नसेल तर दुधी भोपळ्याच्या रसानं तयार केलेलं तेल डोक्याला आणि तळपायाला लावावं. तेल बनवताना दुधी भोपळ्यासोबत त्याची पानं आणि फुलंही घ्यावीत. या तेलामुळं थंडावा निर्माण होतो आणि शांत झोप लागते.

6) अति उष्णता, जुलाब, आम्लपित्त, मधुमेह, अति तेलकट खाण्यामुळं जर वारंवार तहान लागत असेल तर अशा वेळी ग्लासभर दुधीचा रस चिमूटभर मीठ घालून त्याचं सेवन करावं. यामुळं घामावाटे शरीराबाहेर जाणारे क्षार कमी होतात. तहान लागणं कमी होतं आणि थकवाही जाणवत नाही.

7) आजारपणामुळं जर अशक्तपणा जाणवत असेल आणि शरीर कृश झालं असेल तर अशा वेळी दुधी भोपळ्याचा हलवा बनवावा. यात खडीसाखर, वेलची, दूध बदाम, मनुके घालून बनवावा. याचं सेवन जेवणानंतर करावं. यामुळं काही दिवसांतच शरीराचा अशक्तपणा दूर होईल.

8) खूप ताप असेल तर अशा वेळी दुधी भोपळ्याचा सूप पिणं हे एक उत्तम औषध आहे. यामुळं ताप कमी होण्यास मदत होते. ताप जर चढत असेल तर दुधी किसून कपाळावर लेप लावावा. असं केलं तर ताप उतरतो.

9) अति उष्णतेमुळं डोळ्यांची आग होत असेल आणि डोळ्यांची लाली वाढली असेल तर अशा वेळी दुधीचा किस कापसावर ठेवून तो कापूस डोळ्यांवर ठेवावा व शांतपणे पडून रहावं. यामुळं डोळ्यांची उष्णता कमी होते.

10) अति काळजीनं मेंदूचा ताणतणाव वाढला असेल व त्यातून असह्य तीव्र डोकेदुखीचा त्रास होत असले तर अशा वेळी 1 कप दुधीच्या रसात 1 चमचा मध घालून प्याव. यामुळं डोकेदुखी थांबते.

11) पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना पित्ताच त्रास तसेच उष्णतेचा त्रास होत असेल तर नियमितपणे आहारात दुधीचं सेवन करावं. यामुळं शरीराला शीतलता प्राप्त होते.

12) दुधीचे बी औषध म्हणून उपयुक्त आहे. जर या बिया दुधात वाटून घेतल्या तर मेंदूची कार्यक्षमता वाढून विस्मरण कमी होते. तसेच मस्तकातील उष्णता कमी होऊन मेंदूचा उत्साह वाढतो.

13) उष्णतेमुळं जर शरीराची लाहीलाही होत असेल तर दुधीचा रस खडीसाखर घालून प्यावा. यामुळं उष्णतेचा त्रास कमी होतो.

14) लघवीला जळजळ होत असेल तर अशा वेळी ग्लासभर दुधीचा रस घेऊन त्यात अर्ध लिंबू पिळावं. यामुळं मुत्रातील अतिरीक्त आम्लाचं प्रमाण कमी होतं. शरीराची उष्णता कमी होऊन लघवीची जळजळ थांबते.

15) तळपायांना भेगा पडल्या असतील तर अशा वेळी दुधीनं सिद्ध केलेलं तेल तळपायांना लावून पायात मोजे घालावे. यामुळं उष्णतेचा त्रास कमी होतो आणि भेगा भरून येतात.

16) जर तुम्हाला दुधी आवडत नसेल तर कोशींबीर, थालीपीठ, पराठा, हलवा, सूप अशा अनेक स्वरूपात तुम्ही दुधीपासून बनवलेले पदार्थ बनवून खाऊ शकता.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल ॲडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची ॲलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला ॲलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.