मेथीपासून तर पालकपर्यंत, जाणून घ्या पालेभाज्या खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे !

 पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  हिरव्या पालेभाज्या या आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. अनेकदा डॉक्टरही हिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो. परंतु अनेकांना भाज्या आवडत नाही. याचे आपल्या शरीराला अनेक फायदे आरोग्यदायी होतात. कारण हिरव्या पालेभाज्या खूप पौष्टीक असतात. आज याच्या फायद्यांबद्दल आपण माहिती घेणार आहोत.

1) पालक – लोह आणि कॅल्शियम असल्यानं रक्तवाढीला आणि हाडं बळकट व्हायला उपयुक्त असते. ज्यांचे पोट वारंवार बिघडते त्यांच्यासाठीही ही भाजी गुणकारी ठरते.

2) मेथी – मधुमेही व्यक्तीसाठी अत्यंत उपयुक्त असते. भूक आणि अन्नपचन सुधारतं, पोटात गॅसेस होत नाही.

3) चाकवत – तापात किंवा अशक्तपणामुळं तोंडाची चव गेली असल्यास चाकवत तोंडाला चव आणते. अ‍ॅसिडिटीमुळं छातीत जळजळ होत असेल तर या भाजीचा फायदा होतो.

4) शेपू – गॅसेस, लहान मुलांची पोटदुखी, जंत, कृमी मुलींमध्ये अनियमित मासिक पाळीसाठी ही भाजी खूप फायदेशीर ठरते. ही भाजी आवर्जून खायला हवी.

5) माठ – लाल आणि हिरवी अशा दोन प्रकारात मिळणाऱ्या या भाजीनं कृश व्यक्तींचं वजन योग्य प्रमाणात वाढतं. आम्लपित्त नियंत्रित होते. तांबडा माठ रक्तवर्धक आहे.

6) अळू – या भाजीची पानं आणि देठ दोन्ही वापरले जातात. यामुळं रक्तवाढ होते आणि मलावरोध दूर होतो. प्रसूती झालेल्या स्त्रियांमध्ये दूध कमी येत असेल तर अळूची भाजी खावी. यानं फायदा होईल.

7) करडई – ही उष्मांक कमी असल्यानं स्थूल व्यक्तींना वजन नियंत्रणासाठी उपयोगी ठरते.

8) तांदुळजा – या भाजीचं सेवन डोळ्यांचे विकार, खाज सुटणं, मलावरोध यासाठी उपुयक्त ठरतं. वयोवृद्ध व्यक्ती, बाळंतीण, गरोदर स्त्रिया यांना याचा खूप फायदा होतो.

9) मुळा – कच्चा कोवळा मुळा हा मलावरोध विकारांवर, तर थोडा जुना झालेला पण कच्चा मुळा सलाड म्हणून खाल्ला तर मूळव्याध, पोटातले गॅस, अपचन या तक्रारी दूर होतात.

10) अंबाडी – चावीला आंबट लागणाऱ्या या भाजीत क जीवनसत्व आणि खनिज पदार्थ भरपूर असतात. यामुळं प्रतिकारशक्ती वाढून सतत सर्दी, खोकला होणं कमी होतं.

11) घोळू – ही वेगळ्या चवीची बुळबुळीत भाजी आहे. यामुळं यकृताचं कार्य सुधारून अन्नपचन होण्यास मदत होते. आहारात नियमितपणे पालेभाज्यांचा समावेश असावा. किमान अर्धा ते एक वाटी रोज खावी. मात्र त्या स्वच्छ धुवून वापराव्यात. शिजलेल्या भाज्यांचे पाणी टाकून देऊ नये. ते पीठ मळण्यासाठी वापरावं.

टीप –  वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं किंवा सेवन करणं टाळावं.